स्वातंत्र्यदिनाची १५ (ऑगस्टची सुट्टी, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी रक्षाबंधनाची सुट्टी अशा सलग सुट्यांमुळे नागरिकांनी फिरायला जाण्याचे बेत आखले आहेत. परंतु कोकणासह कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूरला जाणाऱ्या रेल्वे फुल्ल झाल्याने नागरिकांनी खासगी ट्रॅव्हल्सकडे आपला मोर्चा वळविला आहे. मात्र प्रवाशांची वाढती मागणी पाहता खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सकरिता नागरिक, पर्यटकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सलग सुट्या आणि पावसाची रिमझिम सुरु असल्याने अनेकांनी पिकनिकला जाण्याची तयार केली आहे. महाबळेश्वरसह कोकण, गोवा, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
मात्र या कालावधीत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे संदेश प्रवाशांना येत आहेत. १५ ते १९ ऑगस्टपर्यंत सलग सुट्ट्या आल्याने, मुंबई. ते सावंतवाडीदरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांना आरक्षणासाठी भलीम ोठी प्रतीक्षा यादी लागली आहे तर १४ ऑगस्टच्या रात्रीपासूनच्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा पार केल्याने ‘रिग्रेट’ झाली आहे. गाड्यांची प्रतिक्षा यादी वाढल्याने प्रवाशांनी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रवाशांची मागणी लक्षात खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरात वाढ झाली आहे.
१४ ऑगस्टपासून मुंबई ते गोवा एसी स्लीपर बसचे भाडे तीन ते साडे तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सध्या हेच भाडे ८०० रुपये ते एक हजारपर्यंत आहे. महाबळेश्वरसाठीही एसी स्लीपरकरिता सध्या एक हजार रुपये झाले आहे. ते १४ ऑगस्टपासून दीड ते दोन हजार रुपये आकारले जाणार आहे, तर एसी सिटिंगकरिता ८०० ते ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गकरिताही स्लीपर बसचे भाडे दोन ते चार हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. कोल्हापूर करिता १८०० ते अडीच हजार, तर औरंगाबादसाठी १६०० ते दोन हजार रुपयांचा तिकीट दर आहे.