कोत्रेवाडी येथील डंपिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात गेले ३४ दिवस कोत्रेवाडी येथील नागरिकांच्या सुरू असलेल्या साखळी उपोषणाची प्रशासन दखल घेत नसेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. याबाबत दोन दिवसांत प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही, तर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रशासनाला दिला आहे. लांजा कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्पाविरोधात गेले ३४ दिवस लांजा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या भेटीवेळी ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले, कोत्रेवाडी ग्रामस्थ हे गेले ३४ दिवस उपोषणाला बसले असून, गणपतीसारख्या सणाच्या दिवसांत देखील हे उपोषण सुरू होते. या उपोषणाला बसलेल्या नागरिकांची गेल्या ३४ दिवसांत साधी दखलही प्रशासनाने घेतलेली नाही. इतक्या बेजबाबदारपणे प्रशासन वागत असेल तर ते चुकीचे प्रशासकीय आहे.
कोणत्याही अधिकाऱ्याने उपोषणस्थळी न येणे, उपोषणाची दखल न घेणे हे कितपत योग्य आहे एवढे अक्षम्य दुर्लक्ष प्रशासनाने करणे हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. या प्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांना मोबाईलवरून संपर्क केला आणि याबाबतची सारी परिस्थिती त्यांच्यापुढे मांडली. यावर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, तालुकाध्यक्ष सुरेश करंबळे, शहरप्रमुख मोहन तोडकरी, तालुका महिला संघटिका पूर्वा मुळे, माजी नगरसेवक लहू कांबळे, शिवसहकारचे जिल्हा समन्वयक परवेश घारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.