जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास अचानक सुटलेल्या वेगवान वाऱ्याने किनारपट्टी भागात धुमाकूळ घातला. गणपतीपुळे, मालगुंड, आरे, निरूळ येथे घरांवर झाडे पडून पाच जणांचे, तर सात दुकानांचे नुकसान झाले. वाऱ्यामुळे अनेक बागांमधील काढणी योग्य हापूस आंबा गळून गेल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे. दापोली, गुहागर, संगमेश्वरसह रत्नागिरीतील ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. वारे वाहू लागल्यानंतर वीजपुरवठाही खंडित केला होता. हवामान विभागाने उद्यापर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविलेला होता. त्यानुसार पहाटेच्या सुमारास अचानक वेगवान वारे वाहू लागले. काही वेळातच विजाही चमकू लागल्या. अचानक झालेल्या या वातावरणातील बदलामुळे महावितरणची बत्तीही गुल झाली. आधीच उष्म्याने त्रस्त रत्नागिरीकरांमधून यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. सुमारे अर्ध्या तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. या वातावरणामुळे सकाळी हवेत गारवा निर्माण झालेला होता.
वाऱ्याचा फटका रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याकडील भागात फटका बसला. गणपतीपुळे किनाऱ्यावरील सुमार सात जणांच्या दुकानांचे छत तुटून पडले होते. त्यामुळे किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले. मालगुंडमध्येही तीच परिस्थिती होती. रत्नागिरी शहरातील मांडवी येथे दीपक मायनाक यांच्या घरावर नारळाचे झाड, तर निरूळ येथे घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झालेः सडामिऱ्या येथील किशोर कृष्णा जाधव यांच्या घराची कौले उडून गेली. आरे येथे राजचंद्र धर्मा जाधव यांच्या घरावर आंब्याची झाडाची फांदी पडल्याने कौलांचे नुकसान झाले आहे. येथील केशव तुकाराम तळेकर यांच्या घरावर नारळाचे झाड पडले. काल सायंकाळी बागांमधील उतरवून ठेवलेले आंबे भिजून गेले तर काढणीयोग्य झाडावरील आंबा गळून गेल्याने नुकसान झाले आहे. यंदा हापूसचे उत्पादन कमी असताना या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले आहे.
दापोली तालुक्यात मध्यरात्री जोरदार वादळी पाऊस झाला. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी उघड्यावर ठेवलेल्या सिमेंट बॅगा भिजल्या, तर परराज्यातून विविध कामे करण्यासाठी आलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी आणलेल्या मजुरांना पावसात भिजावे लागले. त्याशिवाय त्यांच्याकडे असलेले साहित्याचेही नुकसान झाले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मांडवावर वाळत घातलेली सुपारी तसेच गुरांसाठीचे गवत, लाकडे भिजून गेली. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील वीजपुरवठा सुमारे १० तास खंडित झाला होता. त्यामुळे नागरिक हैराण झाले. वीज नसल्याने बँक, पोस्ट ऑफिस व अन्य कामे होऊ शकली नाहीत. गावागावांतून आलेल्या ग्राहकांना पुन्हा परत जावे लागले. त्यामुळे महावितरणच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. रामपूर परिसरातील सुमारे तीस गावांमध्ये अद्यापही मार्च, एप्रिल महिन्याची वीज बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे वीज बिले वेळेत मिळावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.