मुख्यमंत्री बळीराजा वीजसवलत, अन्नपूर्ण योजना, तीर्थदर्शन, मुलींना उच्च शिक्षणासाठी १०० टक्के शुल्कमाफीचा निर्णय अशा योजना राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या जीवनात आमुलाग्र बदल होणार आहेत. जिल्ह्याने विविध क्षेत्रात भरीव प्रगतीकडे वाटचाल कायम ठेवली आहे. विकासाच्या या वाटचालीस रत्नागिरीवासियांचे असेच सहकार्य लाभो, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पोलिसपरेड ग्राउंडवर मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्हा जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प १५ ऑगस्टच्या निमित्ताने सर्वांनी केला आहे.
मागील महिन्यात काही दिवस पावसामुळे विशेषतः राजापूर आणि खेडमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून, यांत्रिकी विभाग आणि नाम फाउंडशेनच्या सहकार्यातून गौतमी नदी रूंदीकरण व खोलीकरण, जगबुडी, वाशिष्ठी, शिव, कोदवली, अर्जुना, मुचकुंदी, काजळी, येरडव, चांदेराई, वैतरणा, शास्त्री आदी नद्यांमधून ६ लाख ४४ हजार ७३९ घनमीटर गाळ काढण्यात प्रशासन यशस्वी झाल्यामुळे पुराचा धोका टळण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील विकासकामांसाठी ३६० कोटी रुपयेइतका निधी जिल्हा वार्षिक योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे सुसज्ज सभागृह निर्माण करण्यात आले. प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद इमारत, पंचायत समिती इमारतीसाठी २०० कोटी मंजूर आहेत. महसूलच्या ५ उपविभागीय कार्यालयांना दिलेल्या प्रत्येकी ५ कोटी निधी दिला आहे. लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यातील २ लाख ७४ हजार ३४६ लाभार्थ्यांना जुलै व १ लाख ९८ हजार खात्यात ३ हजार रुपये जमा झाले. ऑगस्ट महिन्यात ८२ कोटी ३० लाख ३८ हजार रुपयांचा लाभ दिला जाईल. ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेत ३ हजार रुपयांप्रमाणे ४ हजार ४९४ लाभार्थ्यांना १ कोटी ३४ लाख ८२ हजार वितरण होणार आहेत.