प्रामाणिकपणे काम केल्यानंतर त्याचे फळ मिळते, हा विश्वास जपत रत्नागिरी तालुक्यातील फणसोप-मागलाडवाडी येथील अंगणवाडी सेविका भाग्यश्री मुरकर यांनी पतीच्या सहकार्याने नारळाच्या झावळांपासून झाडू, गांडूळ खत युनिट, कागदी पत्रावळ्या यामधून उत्पन्नाचा पर्याय निर्माण केला आहे. फणसोप येथे २१ वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या भाग्यश्री या फणसोप येथील दीपश्री महिला बचतगट आणि श्री लक्ष्मीकेशव उत्पादन गटाच्या अध्यक्षा आहेत. अतिशय मेहनती आणि उत्तम व्यवस्थापनासह प्रयोगशील वृत्ती यांसह त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असलेले त्यांचे पती भार्गव मुरकर यांच्यामुळे शेतीपूरक उद्योगांमधून उत्पन्नाचे पर्याय निर्माण केले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी वाया जाणाऱ्या झावळांपासून झाडू बनवण्यास सुरवात केली.
वर्षाला सुमारे दोन ट्रक भरतील एवढी झावळापासून १०० हून अधिक झाडू बनवून एक झाडू ७० रुपयांना विकतात. झावळांपासून झाडू बनवताना फुकट जाणाऱ्या पातींचा उपयोग व्हावा, यासाठी घराजवळच गांडूळ खतांचे युनिट सुरू केले. सुरुवातीला १२ बाय ४ मीटरचा एक बेड तयार केला. त्यासाठी अनुलोम संस्थेच्या रवींद्र भुवड यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले होते. यासाठी लागणारे शेण जमवण्यासाठी भाग्यश्री यांनी प्रसंगी गावातील कातळ परिसरही धुंडाळला होता. गावातील गुरे चरवण्यासाठी कातळावर फिरवली जातात. तेथे मोठ्या प्रमाणात शेण पडून राहायचे. त्याचा उपयोग त्यांनी यासाठी केला. पहिल्या वर्षी सुमारे एक टन खत त्यांना मिळाले. त्याचा उपयोग विक्रीसाठी न करता त्यांनी गावातील काजूच्या बागेत केला.
पुढे त्यांनी १८ बाय ५ मीटरचे तीन बेड तयार केले आहेत. त्यामधून वर्षभरात ५ टन खत तयार होते. १५ रुपये किलोने ते खत गावातील आंबा बागायतदारांसह शेतकऱ्यांना विकतात. यासाठी त्यांना उमेदच्या वनश्री आंब्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. खताच्या विक्रीसाठी त्यांनी आकर्षक पॅकिंग तयार केले आहे. पिशवीमधील गांडूळ खत दोन किलोला ५० रुपयांनी त्या विकतात. यामधून सुमारे ४० ते ४५ हजार रुपये मिळतात. गांडूळ खताच्या जोडीला दुग्ध व्यवसायही सुरू केला. त्यामधून महिन्याला ३५ हजार रुपये मिळत होते. सध्या म्हैशी विक्रीला काढल्या आहेत. सध्या लग्न समारंभासह विविध सोहळ्यांमध्ये जेवण, नाष्टा यासाठी लागणाऱ्या कागदाच्या डिश बनवून त्या विकल्या जातात. वर्षाला सुमारे १० हजाराहून अधिक डिशेस तेवढेच द्रोण करून विकतात.