गुड नाईट, स्वीट ड्रीम्स ! टेक केअर, बाय…’ असा स्टेटस् ठेवत महाविद्यालयीन शिक्षणासाठी रत्नागिरी शहरात मित्राच्या कुटुंबासोबत राहाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने मित्राच्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी शहरातील उच्चभ्रु वस्तीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. अकरावी सायन्सला ही मुलगी शिकत होती. आत्महत्या करण्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. शहर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली असून अधिक तपास पोलिस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अल्पवयिन मुलीची आणि ती ज्या तरुणाच्या घरी राहात होती त्याच्यासोबत अनेक वर्षे मैत्री होती. गेली २ वर्षे ती त्याच्याच घरी त्याच्या कुटुंबियांसोबत राहात होती. मध्यंतरीच्या काळात या मुलीच्या आईने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी मुलीला महिला पोलिस अधिकाऱ्यांनी समजावून सांगितले होते. त्यानंतर ती मुलगी आपल्या आईकडे गेली.
परंतु काही दिवसांनी पुन्हा ती मित्राच्या कुटुंबासोबत राहात होती. तरुणाचे वडील शासकीय नोकरीत असल्याचे समजते. त्यांच्याकडे ही अल्पवयिन मुलगी शिक्षणासाठी रहात असल्याचे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे असल्याचे पोलिसांना तिच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यानं शनिवारी अचानक या मुलीने राहात्या घरातच पंख्याला ओढणीने गळफास घेतला. घरी आल्यानंतर तरुणाच्या कुटुंबियांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तिच्या आई-वडीलांनाही याची खबर दिली आणि मुलीला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केली. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान ज्या मुलाशी तिची मैत्री होती तो सिंधुदुर्गला कामानिमित्त गेला होता. त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयातच होता.
आईचा रुग्णालयात टाहो ! – मुलीच्या आईने रुग्णालयात पोहोचताच टाहो फोडला. दरम्यानं याबाबत आईनेच शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीमध्ये अज्ञात कारणामुळे माझ्या मुलीने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
कालच आईशी चर्चा – कालच आईबरोबर मुलीची फोनवर चर्चा झाली होती. मी बरी आहे, अकरावीच्या परीक्षेचा अभ्यास सुरु आहे, असा संवाद दोघींमध्ये झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे तिने असा टोकाचा निर्णय का घेतला, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
अधीक्षकांनी घातले लक्ष – पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येला कोण जबाबदार असेल त्याचा नक्की शोध घेतला जाईल. मुलीच्या नातेवाईकांवर कोणी दबाव आणत असेल तर त्यांनी थेट आपल्याला भेटावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.