महसूल खात्याने भूमिअभिलेख विभागाद्वारे, कोकणात साडेसात हजार गावागावातील अभिलेखाची माहिती गोळा करण्यासाठी व मालमत्ताधारकांना मिळकत पत्रिका देण्यासाठी गावपातळीवर मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले आहे.
कोकणातील पाचही जिल्हा प्रशासनात महसूल विभागात आतापर्यंत पाच हजार ४५३ गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र आता अपुर्या मनुष्यबळाचा फटका या कामाला बसू लागल्याने प्रत्येक जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून कर्मचार्यांच्या सेवा वर्ग केल्या जात आहे. त्यामुळे अनेक किलोमीटर अंतर कापून कर्मचारी इतर जिल्ह्यात येत आहेत.
ड्रोनद्वारे गावठाणाच्या सर्वेक्षणासाठी कर्मचाऱ्यांचे पाठबळ कमी पडत असल्याने, मदतीसाठी इतर जिल्ह्यातील कर्मचार्यांच्या सेवा याकामी वर्ग केल्या जात आहेत. याला कर्मचार्यांनी विरोध केला असून याबाबत जमाबंदी आयुक्तांना निवेदन देऊन काहीशा प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.
त्याचप्रमाणे, या कामामध्ये ग्रामविकास विभागाच्या कर्मचार्यांची खरतर मदत अपेक्षित आणि आवश्यक देखील असताना ते सहकार्य करीत नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. तसेच एका गावाचे काम त्याच दिवशी पूर्ण करण्याच्या नियमाने कर्मचार्यांना अतिरिक्त ताणही जाणवत आहे.
गावात ५०० हून जास्त संख्येने घरे असतील तर, तेथील सर्व प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण करणे अशक्य आहे. सुट्टीच्या दिवशी कामाची सक्ती, इतर भौतिक सुविधांचा अभाव यांकडे कर्मचार्यांनी जमाबंदी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. तसेच ड्रोन सर्वेक्षणासाठी मिळणारा निधी खर्च करण्याबाबत उदासीनता आहे. जमाबंदी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये, अनेकदा कर्मचारी करावा लागणारा आवश्यक खर्च स्वत:च्या खिशाला कात्री लाऊन करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जर विशेष विभागाची मदत मिळाली तरच, हे गावठाणचे काम लवकर वेळेत करणे शक्य होणार आहे.