महाडमध्ये आज हेलिकॉप्टर वेगाने येऊन ‘क्रॅश’ झाले आणि सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. शिवसेना ठाकरे गटाच्या झुंजार नेत्या सुषमा अंधारे यांना पुढील सभेला घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर आले होते, त्याचे ‘लँडींग’ होत असतानाच ते ‘क्रॅश’ झाले आणि धुळीचे लोळ उठले व आसमंतात प्रचंड आवाज घुमला! सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ही घटना घडल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही तसेच कॅप्टनही बालंबाल बचावला. मात्र हेलिकॉप्टर ‘क्रॅश’ झाले तेव्हा जो प्रचंड आवाज झाला त्यामुळे जणू महाड हादरले व सर्वत्र खळबळ उडाली. महाडच्या दस्तुरी नाका परिसरातील मैदानावर हेलिकॉप्टर उतरत असताना सकाळी ८.४० चे सुमारास ही दुर्घटना घडली.
घटना डोळ्यासमोर ! – ही दुर्घटना सुषमा अंधारे यांच्या डोळ्यासमोरच घडली. त्यांची गुरुवारी रात्री. महाडमध्ये ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार श्री. अनंत गीते यांच्या प्रचारासाठी जोरदार सभा झाली. सभा आटोपल्यावर त्या महाड शहरानजीक असलेल्या ‘पीजीसीटी’ हॉटेलमध्ये मुक्कामाला होत्या.
हेलिपॅडवर दाखल ! – स. ८.३० वा. त्या हेलिकॉप्टरने पुढील सभेसाठी रवाना होणार होत्या. त्यासाठी महाड नजीक दस्तुरी नाका परिसरातील चिचकर ग्राऊंड येथे असलेल्या हेलिपॅडवर त्या पोहोचल्या. हेलिकॉप्टर आलेले नव्हते, ते का आले नाही याची त्यांनी चौकशी केली तेव्हा हेलिकॉप्टर पाठविले असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
मंडणगड व रोहा सभा – ही दुर्घटना सुषमा अंधारेंच्या नजरेसमोर घडली. याबाबतचा ‘आँखो देखा’ वृत्तांत त्यांनी सांगितला की, “त्यांना मंडणगड व रोहा येथील सभांना जायचे होते. त्याकरीता त्या हेलिकॉप्टरची वाट पहात होत्या. थोड्या वेळाने चॉपर येताना दिसले. सुरुवातीला चॉपरने दोन-तीन घिरट्या घातल्या व अचानक आसमंतात प्रचंड आवाज घुमला”.
धुळीचे प्रचंड लोट ! – त्यांनी पुढे सांगितले, पाठोपाठ धुळीचे लोट उठले. सुरुवातीला निटसे काही समजले नाही, परंतु जवळचे लोक सांगत होते की पुढे जाऊ नका. आम्हाला कॅप्टनची चिंता वाटत होती परंतु कॅप्टन सुखरुप आहेत” अशी त्यांनी माहिती दिली.
सुषमा अंधारे सुखरुप – सुषमा अंधारेंनी पुढे माहिती देताना सांगितले की, “ते व त्यांचा लहान भाऊ असे दोघे प्रवास करणार होते. आम्ही सगळे सुखरुप आहोत. प्रवास सुरु होण्याआधीच ही घटना घडली” असे त्यांनी सांगितले. सुषमा अंधारे या पेशाने वकील आहेत. तसेच राज्य शास्त्र व समाज शास्त्र विषयाच्या व्याख्यात्या आहेत.
आक्रमक शैलीतील भाषण – सुषमा अंधारे या स्त्रीवादी अभ्यासक तसेच आंबेडकरी व भटक्या विमुक्त चळवळीतील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या आहेत. आक्रमक शैलीतील त्यांचे भाषण श्रोत्यांना विलक्षण पसंत पडते. शिवसेनेच्या म ागील वर्षाच्या दसरा मेळाव्यात त्यांनी भाषण केले होते.
खात्याचा हलगर्जीपणा? – या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या त्या स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या खास भाषण शैलीसाठी त्या ओळखल्या जातात. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरणार होते, त्या ठिकाणी कोणतीही सुविधा नव्हती, जमिनीवर पाणी मारलेले नव्हते त्यांमुळे ही घटना घडली असल्याची माहिती पायलटने घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना दिली.
जनतेत तीव्र संताप – संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाच्या निव्वळ हलगर्जीपणा या दुर्घटनेला कारणीभूत असल्याचे जनतेत खुलेआम चर्चिले जात आहे. महाडमधील शिवसेना नेत्यांकडून या हलगर्जीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अखेर सुषमा अंधारे कारने पुढील प्रवासासाठी रवाना झाल्या.