जयगड येथील जिंदाल कंपनीच्या परिसरात एलपीजी वायू गळती १२ डिसेंबरला दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. या वायुगळतीमुळे नजीकच्या नांदीवडे माध्यमिक विद्यामंदिर जयगड, आणि कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. या वायूमुळे मुले बेशुद्ध पडू लागली. श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने मळमळ होऊन मुले उलट्या करु लागली होती. अशा बाधित मुलांना मिळेल त्या खाजगी गाडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही मुले तेथील उर्जा आरोग्य केंद्रात भरती करण्यात आली. या प्रकाराने जयगड भागात मोठे भितीचे वातावरण पसरले असताना कंपनीने या प्रकाराबाबत हात झटकले. मात्र स्थानिक लोकांनी राजकीय पक्षांच्या मदतीने आवाज उठवल्याने कंपनीने चार अधिकाऱ्यांचे निलंबन केले. व या प्रकाराची चौकशी सुरु केली. येथील शाळेतील मुख्याध्यापक वाघोदे यांनी तात्काळ कंपनीच्या अधिकारी आणि विद्यालय कमिटीला वायू गळतीमुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाची कल्पना देवून आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहाय्याने जिंदालच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरला प्राथमिक उपचारासाठी हलवले.
या घटनेतील ६० विद्यार्थी व एका महिलेवर उपचार करण्यात आले आहे. जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्ट विभागातील एलपीजी प्रकल्पाच्या देखभालीचे काम सुरु होते. या एलपीजी कामावर नियंत्रण असणारे अधिकारी गंगाधर बंडोपाध्याय, भाविन पटेल व अभियंते सिध्दार्थ कोरे व दीप विटलानी यांनी योग्य ती काळजी न घेतल्याने व त्यांच्या निष्काळजीपणामुळे वायु हवेत पसरल्याने या घटनेस हेच अधिकारी व अभियंते जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५, २८६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यानं जयगड परिसरातील गावातील ग्रामपंचायतींनी कंपनी विरोधात ठराव करुन जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. जे एस डब्लू कंपनीतील वायुगतीच्या प्रकाराने नांदिवडे विद्यालयातील विद्यार्थ्यांना झालेला त्रासानंतर या प्रकारची चौकशी कंपनीच्या संबंधित यंत्रणेने केले आहे. या प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. या प्रकारच्या चौकशीचा अहवाल आल्यावरच वायु गळतीमध्ये कोणता प्रकार घडला हे समजू शकेल, असे जेएसडब्लुचे संपर्क अधिकारी सुदेश मोरे यांनी सांगितले.
जयगड येथील जिंदाल कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे. ज्या ठिकाणी जिंदाल कंपनीचे बॉयलरचे पाणी सोडले जाते त्या ठिकाणीची मासेमारी पूर्णतः नष्ट झाली आहे. या भागात मच्छीमारांना महाकूळ यासारखे मासे टनावर मिळत होते. मात्र आता या समुद्र भागामध्ये माशांचे नामोनिशाण मिटले आहे. कंपनीने याकडे दुर्लक्ष करून मच्छीमारांचे मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा ही कंपनीच्या बाजूने असल्याने कोणतीच उपाययोजना केली जात नाही. नुकत्याच झालेल्या वायू गळतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी प्रसंग भेतला होता. यातील काही विद्यार्थ्यांना कंपनीच्या ऊर्जा या आरोग्य केंद्रामध्ये भरती करण्यात आले होते. मात्र या आरोग्य केंद्रात ऑक्सिजन व्यवस्थेबरोबर इतर कोणतेही सोयी सुविधा नसल्याने या विद्यार्थ्यांना रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालय हलवण्यात आले होते. जर ऊर्जा केंद्रामध्ये आरोग्य विषयीच्या सोयी सुविधा उपलब्ध असता तर विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचार झाला असता. या सगळ्याकडे कंपनीचे अधिकारी डोळेझाक करत आहेत, असा आरोप जयगड येथील मच्छिमार शराफत गडबडे यांनी केला आहे.