तालुक्यातील गाणे राजवाडा येथील आदिवासी कातकरी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा संशयास्पद मृत्यू झाला. मंगल मनोहर वाघे (वय १५) आणि सुप्रिया यशवंत वाघे (१४) अशी मृत मुलींची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. २१) घडली. त्या दोन्ही बहिणी शेळ्यांना चारण्यासाठी घरामागील जंगलात गेल्या होत्या. दुपारनंतर घरी आल्यानंतर त्या मृतावस्थेत आढळल्या. दोघींच्या मृतदेहाचे कामथे उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. विच्छेदन अहवालानंतरच या मुलींचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, याचा उलगडा होणार आहे. या दोघीही गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता घरामागील जंगलात शेळ्या चारण्यास गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजता घरी परतल्यावर त्यांनी शेळ्यांना गोठ्यात बांधून ठेवले. या वेळी आई-वडील कामावर गेल्याने घरी कोणी नव्हते. काही वेळाने त्यांच्या मोठ्या बहिणीने घरात पाहणी केली असता त्या दोघी कुठेही दिसल्या नाहीत.
शोधाशोध केल्यावर त्या गोठ्याजवळ तळमळत असल्याचे दिसून आले. बहिणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ त्यांना घरात आणण्यात आले; मात्र तोपर्यंत दोघींचा मृत्यू झाला होता. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली; मात्र त्याचा उपयोग झाला नाही. या घटनेची माहिती मिळताच शिरगावचे सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही; मात्र विषबाधेचा संशय व्यक्त केला जात आहे. या दोघींचा मृतदेह विच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात गुरुवारी रात्री १० वाजता नेण्यात आला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक भरत पाटील अधिक तपास करत आहेत.
दसपटीतील दुसरी घटना – काही महिन्यांपूर्वीच कादवड येथील दोन आदिवासी तरुणी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या असता त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता. वैद्यकीय अहवालात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर आता गाणे राजवाडा येथील दोन युवतींच्या बाबतीत संशयास्पद घटना घडली आहे.
वैद्यकीय अहवालाकडे लक्ष – गाणे येथील दोन्ही मुलींचा मृत्यू संशयास्पद असला तरी प्रथमदर्शी विषबाधेतून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे; परंतु वैद्यकीय अहवालानंतरच यामागची वस्तुस्थिती उघड होणार आहे. पोलिसयंत्रणेकडून चौफेर चौकशी केली जात आहे. त्यामुळे याप्रकरणी होणाऱ्या तपासाकडेदेखील सर्वांचे लक्ष लागले आहे.