पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, नवी दिल्लीमध्ये भारताच्या विजयाचे प्रतीक म्हणून १६ डिसेंबर २० रोजी ही स्वर्णिम विजयी मशाल प्रज्वलित करण्यात आली होती. भारत-पाक दरम्यानच्या १९७१ च्या बांगलादेश निर्मिती युद्धातील विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, भारतात स्वर्णिम विजय वर्ष साजरे केले जात आहे. हि विजयी मशाल देशाच्या चार मुख्य दिशांना प्रवास करते आहे. पश्चिम क्षेत्रातील विजयी मशाल, म्हणजेच स्वर्णिम विजय मशाल बुधवारी मुंबईत दाखल झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडिया येथे या मशालीचे स्वागत करण्यात आले. यानिमित्त गेट वे ऑफ इंडिया इथे, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्रातील मुख्यालयांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलेला. लष्करी क्षेत्रातील मान्यवर तसेच इतर मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, १९७१ च्या युद्धात शौर्यचक्र मिळवलेल्या सैनिकांचा सत्कारही करण्यात आला.
भारतीय तिन्ही हवाई दलांच्या संयुक्त बँडपथकाचा गेट वे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमही झाला त्याचप्रमाणे विमानांनी यावेळी हवाई मानवंदना देखील दिली. ही विजयी मशाल ९ सप्टेंबर पर्यंत मुंबईमध्ये राहणार असून, त्यानंतर ती गोवा राज्यात पणजीसाठी रवाना होणार आहे. हि विजयी मशाल महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा मुख्यालयाच्या प्रतिनिधींसह, १९७१ च्या युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या घरी नेली जाणार आहे. या काळामध्ये, भारतीय सैन्यदलातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.