कोकणातील पहिले सिंथेटिक अॅथलेटिक्स मैदान डेरवण येथे उभारण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात दर्जेदार क्रीडांगणावर स्पर्धा खेळण्यास मिळत होत्या. आता रत्नागिरीत उभारण्यात येत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलातही १२ कोटी रुपये खर्च करून सिंथेटिक क्रीडांगण उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ४०० मीटरचा ट्रॅक या ठिकाणी बांधला जात असून ग्रामीण भागातील नवीन अॅथलिटस्ना त्याचा निश्चितच चांगला फायदा होणार आहे. क्रीडा विकासासाठी जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधी मंजूर केला होता. २०१२ मध्ये रत्नागिरीत एमआयडीसीमध्ये जागा निश्चित करण्यात आली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे भूमी पूजनही झाले होते. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी विशेष पाठपुरावा केला होता. हे काम विविध कारणांमुळे रखडले होते.
सुरुवातीला मैदान, त्यानंतर मुलांसाठी वसतिगृह आणि शेवटी कार्यालय अशा पध्दतीने क्रीडा संकुल बांधणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले तेव्हा सुरुवातीला कार्यालय उभारण्यात आले. त्यानंतर सिंथेटिक मैदानाला सुरुवात झाली आहे. मैदान आणि वसतिगृह या दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्या तर त्याचा फायदा स्पर्धांसाठी येणाऱ्या खेळाडूंना होईल. शहरापासून एका बाजूला असलेल्या या जिल्हा क्रीडा संकुलाच्या आजूबाजूला निवास व्यवस्था नाही. सध्या सिंथेटिक मैदान बांधण्याचे काम दोन दिवसांपूर्वी हाती घेण्यात आले आहे. यामध्ये ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉलसह अन्य खेळांची मैदानेही त्यात बनविण्यात येणार आहेत.
काळजी घेण्याचे आव्हान – डेरवण (चिपळूण) येथे वालावलकर ट्रस्टमार्फत सिंथेटिक ट्रॅक आणि मैदान उभारण्यात आले आहे. त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा या मैदानावर खेळविण्यात येत आहेत. त्याचबरोबर नियमित सरावासाठीही हे मैदान उपलब्ध करून दिले जाते. या मैदानाची काळजी घेण्यासाठी कामगारांचीही नियुक्ती केली गेली आहे. त्याच धर्तीवर नव्याने होऊ घातलेल्या जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक मैदानाबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.
पाण्याची व्यवस्था करण्याची गरज – उन्हाळ्यात सिंथेटिक मैदानावर वारंवार पाण्याचा मारा करावा लागतो. त्यासाठी मैदानाजवळ पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मैदानासाठी जागा निश्चित करण्यात आली तेव्हा तिथे विंधण विहीर खोदण्यावर चर्चा झाली होती. त्यानुसार कार्यवाही झालेली नाही. एमआयडीसी क्षेत्रात हे मैदान असल्यामुळे त्यांच्याकडून कायमस्वरुपी पाणी लागणार आहे. धावणे मार्गाच्या मध्ये फुटबॉलसाठी लॉनचे (गवत) मैदान तयार केले जाईल. त्यासाठी पाण्याची गरज भासू शकते. मैदानाबरोबरच पूरक सुविधांकडेही जिल्हा क्रीडा विभागाला लक्ष द्यावे लागणार आहे.