आज रविवारी दि. १७ ऑक्टोबरपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांना दुबईमध्ये सुरूवात होत आहे. जगभरातून १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून, या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबईमध्येच लागणार आहे. स्पर्धेच्या ७ व्या पर्वाचे सामने ओमान आणि युएईमध्ये खेळवले जाणार आहेत.
या स्पर्धेत मुख्य १२ संघांमध्ये स्पर्धा होणार आहे. मात्र त्याआधी पात्रता सामने खेळवले जाणार आहे. त्यामध्ये चार संघांचा स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला जाईल. जे संघ क्वालिफाय होतील त्यांच्यासाठी गट अ आणि गट ब बनविण्यात आले आहेत. पहिल्या गटामध्ये नामिबिया, नेदरलँड, आयर्लंड आणि श्रीलंका या संघाना स्थान देण्यात आले आहे, तर दुसर्या गटात बांगलादेश, ओमान, न्यू पापुआ गिनी आणि स्कॉटलंड हे संघ आहेत.
स्पर्धेतील प्रमुख १२ संघांची गट १ आणि गट २ मध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दोन क्वालिफायर संघ पहिल्या गटामध्ये समाविष्ट असतील. तर दुसऱ्या गटामध्ये भारत, पाक, अफगाणिस्तान, न्यूझीलंडसह दोन क्वालिफायर संघ असल्याची माहिती मिळाली आहे.
भारतीय संघ स्पर्धेत उतरण्यापूर्वी संघाचा १८ ऑक्टोबर व २० ऑक्टोबर रोजी सराव सामना खेळवला जाईल. या स्पर्धेचे नियोजन भारतामध्येच होणार होते. मात्र, कोरोना महामारीच्या अति प्रादुर्भावामुळे या स्पर्धेचे नियोजन दुबईमध्ये करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे म्हणजेच बीसीसीआयकडे आहे.
२४ ऑक्टोबरला स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना खेळवण्यात येणार आहे. परंतु, सोशल मिडीयावर एक वेगळीच चर्चा पहायला मिळत आहे. भारत आणि पाक यांचा सामना न होण्यासाठी नवीन ट्रेंड व्हायरल होत आहे.