भाजपचे जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते व माजी आमदार श्री. बाळासाहेब माने यांनी काल दि. २४ रोजी ‘मातोश्री’वर जाऊन श्री. उध्दव ठाकरे यांची भेट घेतली अशी चर्चा आज सकाळपासूनच रत्नागिरी शहर व परिसरात सुरु आहे. श्री. बाळासाहेब माने हे त्यांच्या वडिलांपासूनचे भाजपचे कट्टर व निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात.
सहकुटुंब मातोश्रीवर ? – अशा स्थितीत त्यांनी मंगळ. दि. २४ सप्टें. रोजी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख श्री.. उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट त्यांनी सहकुटुंब घेतली. तसेच त्यावेळी त्यांचेसोबत शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आ. भास्करशेठ जाधव होते अशी चर्चा आज ठिकठिकाणी जनतेत सुरु होती.
चलबिचल सुरु – श्री. बाळासाहेब माने हे येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटातर्फे निवडणुक रिंगणात उतरणार की काय? अशीही चर्चा सुरु झाली. श्री. बाळासाहेब माने व आ. भास्करशेठ जाधव हे एकमेकांचे साडू लागतात. आ. बाळासाहेब माने यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उध्दव ठाकरेंची भेट घेतल्याची चर्चा सुरु होताच राजकीय वर्तुळात चलबिचल सुरु झाली.
नेमके कारण काय ? – मात्र या वृत्ताला रात्री उशिरापर्यंत कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. श्री. बाळासाहेब माने यांच्या चिरंजीवांचा विवाह ठरला असून साखरपुडा देखील झालेला आहे. कदाचित चिरंजीवांच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ते ‘मातोश्री’वर गेले असावेत अशी शंका व्यक्त केली जात आहे.
ठाकरे गटाचा दावा – शिवसेना ठाकरे गटाने रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघांवर हक्क सांगितला आहे. गुहागर मतदार संघातून विद्यमान आमदार भास्करशेठ जाधव व राजापूर, लांजा मतदार संघातून विद्यमान आमदारराजनसाळवीयांनापुन्हापक्षाची उमेदवारी मिळणार हे स्पष्ट आहे. खेड, दापोली मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे श्री. संजय कदम यांचीही उमेदवारी निश्चित असल्याचे चर्चिले जाते.
चिपळूणवर हक्क – चिपळूण मतदार संघातून आता महाविकास आघाडीचा कुणी आमदार नाही, यापूर्वीच्या निवडणूकीत तेथून लागोपाठ शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते त्यामुळे ती जागाही आपल्याला मिळावी असे शिवसेना ठाकरे गटाचे म्हणणे आहे. रत्नागिरी, संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गट कुणाला उमेदवारी देणार याबद्दल अद्यापही संभ्रम आहे. या घटकेला माजी जि. प. अध्यक्ष श्री. राजेंद्र महाडिक व श्री. उदय बने यांची नावे चर्चेत आहेत. अशा स्थितीत श्री. बाळासाहेब माने ‘मातोश्री’वर गेले असतील तर नेमके कोणत्या कारणासाठी याची चर्चा आता सुरु झाली आहे.