26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriजिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

सुनील तटकरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना माझा चेला, असा उल्लेख केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कार्यकर्ते फोडण्याची स्पर्धा रंगली असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना माझा चेला, असा उल्लेख केला. त्यामुळे दोन पक्षातील ही स्पर्धा आता गुरू विरुद्ध चेला अशी रंगणार आहे. ठाकरे शिवसेनेत सक्रिय असलेले लांजा येथील अजित यशवंतराव यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने ठिणगी पडली असून, यामध्ये कोण कोणाला शह देणार, याचीच चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जुने सहकारी अजित यशवंतराव यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शेखर निकम यांचे कौतुक केले. त्यामुळे यशवंतराव यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशात निकम यांचा मोलाचा वाटा असल्याची शंका पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार भैय्या सामंत यांना आली आहे.

यशवंतराव यांनी सामंतांसह आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षावर टीका केली होती. त्यामुळे यशवंतराव यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश सामंत यांना रुचलेला नाही. ते लांजा-राजापूर मतदार संघातून मागील विधानसभेला इच्छुकही होते. त्यासाठी अजित पवार यांची त्यांनी भेटही घेतली होती. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाला कारणीभूत ठरलेले आमदार निकम हे पालकमंत्री सामंत यांचे लक्ष्य झाले आहेत. यशवंतराव यांचा प्रवेश करताना विश्वासात घेतले पाहिजे होते, असा पवित्रा मंत्री सामंत यांनी घेतला आहे. तसेच त्यांच्या प्रवेशामुळे लांजा-राजापुरातील राजकीय घडी विस्कटण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सुरू असलेल्या या रंगतदार नाट्यात राष्ट्रवादीला मात देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी चिपळूणमधील राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. यादव महायुतीत आले तर आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार निकम यांची अडचण होईल.

यशवंतराव यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गुहागर विधानसभा मतदार संघातील चिपळूण तालुकाप्रमुख शरद शिगवण यांच्यासह दोन विभागप्रमुख, उपविभागप्रमुखासह आठ शाखाप्रमुख आणि समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. हे सर्व पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी शिगवण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रवेश देताना पालकमंत्री उदय सामंत हे माझे चेले आहेत. महायुतीच्या बैठकीत त्यांचे गैरसमज दूर करू, असे सांगितले आघाडी सरकारच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यावर पंधरा वर्षे तटकरे यांनी एकहाती राज्य केले होते. मंत्रिपद मिळाल्यानंतर भास्कर जाधव यांनी तटकरे यांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तटकरे यांनी सामंत यांना पुढे आणले; मात्र मागील दहा वर्षात पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी जिल्ह्यावर मजबूत पकड मिळवली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने संघटना बांधणीला सुरुवात केल्यानंतर सामंतांनी उघड नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पालकमंत्र्यांचा उल्लेख ‘माझा चेला’ असा करून त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular