गुहागरमधील एक शिक्षक आपली पत्नी आणि दोन मुलांसह गणेशोत्सवासाठी आपल्या हिंगोलीमधील गावी जात असताना अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली. नातेवाईकांनी शोधाशोध करूनही हे कुटुंब सापडत नसल्याने चिंता वाढली. सर्वांच्याच काळजाचे ठोके चुकत असतानाच गुरूवारी २८ ऑगस्टला सकाळी हे कुटुंब सुखरूप असल्याचे कळले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ४० तासांच्या या शोधाशोधीचा शेवट गोड झाला. बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झालेले शिक्षक ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण यांनी या साऱ्या घटनेचा व्हिडिओ स्वतः व्हायरल केला असून कुंभार्ली घाटात नेमके काय झाले, ते या व्हिडिओतून पुढे आले आहे.
मंगळवारी दुपारी निघाले – ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे गुहागरमध्ये शिक्षक आहेत. ते मूळचे हिंगोली जिल्ह्यातील असून मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गणेशोत्सवासाठी ते आपली पत्नी आणि दोन मुलांसह गावी कारने निघाले होते. कुंभार्ली घाटातून जात असताना मुसळधार पाऊस आला आणि त्यानंतर त्यांचा आणि कुटुंबियांचा मोबाईलवरील संपर्क तुटला. त्यामुळे नातेवाईक अस्वस्थ झाले. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतरही स्वतः ज्ञानेश्वर चव्हाण, त्यांच्या पत्नी आणि दोन मुले न सापडल्याने नातेवाईकांनी अखेर पोलीसांकडे तक्रार नोंदविली. पोलीसांनी शोधकार्य सुरू केले. पोलीस आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. तब्बल ४० तासांनंतर ते सुखरूप असल्याचे स्वतः त्यांनीच आपल्या नातेवाईकांना कळविले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या ४० तासांत नेमके काय घडले? याचा आखोंदेखा हाल सांगणारा एक व्हिडिओ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्हायरल केला आहे. त्याद्वारे नेमके काय घडले? हे पुढे आले आहे.
ज्ञानेश्वर चव्हाण गुरूजींनी आपण गुहागरमधून निघाल्यापासून कुंभार्ली घाटात नेमके काय काय घडले, याची सारी इत्यंभूत माहिती दिली आहे. जणूकाही आँखो देखा हाल त्यांनी कथन केला आहे. चव्हाण यांनी म्हटले आहे की, गणपतीची सुट्टी लागल्याने ते गुहागरम धून गावी जाण्यासाठी आम्ही निघालो. माझ्यासोबत माझी पत्नी आणि दोन मुलं होती. आम्ही जात असताना कुंभार्ली घाटात धुँवाधार पाऊस पडत होता. या पावसात आमच्याकडे असणारे दोन्ही मोबाईल फोन भिजले आणि बंद पडले. आणखी एक मोबाईल होता त्याची बॅटरी डाऊन झाली. यामुळे आम्ही कुटुंबियांशी संपर्क साधू शकत नव्हतो. काय करायचं कळत नव्हतं.
आम्ही नेहमीप्रमाणे गोंदवलेकर महाराजांच्या माण येथील मठामध्ये मुक्कामी राहण्यासाठी थांबलो. इथूनच घरी जायचं ठरलं होतं, मात्र मोबाईल बंद पडल्याने मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांशी संपर्क होऊ शकला नाही. स्वाभाविकपणे त्यांची काळजी वाढली. नातेवाईक घाबरले मात्र गोंदवलेकर महाराजांची कृपा आणि सर्वांचे प्रेम यामुळे आम्ही सुखरूप आहोत. खात्री पटावी यासाठी हा व्हिडिओ आम्ही पाठवत आहोत. मंगळवारी बेपत्ता झालेले हे कुटुंब सुखरूप असल्याचे गुरूवारी सकाळी ९.५० वा. व्हिडिओच्या मध्यिमातून सुखरूप असल्याचे कळताच पोलीसांसह नातेवाईकांनाही मोठा दिलासा मिळाला.