तालुक्यातील सागवे हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पालकांनी वादग्रस्त शिक्षकाच्या उपस्थितीबद्दल आक्रमक पवित्रा घेत शाळेवर धडक दिली. विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्या शिक्षकावर गावकऱ्यांनी केला असून त्याला पुन्हा शाळेत रूजू करून घेतल्याने पालक आणि स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या शिक्षकावर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी नाटे पोलीस स्थानकात धडक देत पालक व ग्रामस्थांनी त्या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर नाटे पोलीसांनी त्या शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती नाटे पोलीसांनी पत्रकारांना दिली. याप्रकरणी त्या शिक्षकाला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयित आरोपी बलवंत मोहिते याला १ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
या प्रकरणी एका पिडीत मुलीच्या आईने नाटे पोलिसात तक्रार दिली असून त्याप्रमाणे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सप्टेंबर २०२४ मध्ये संबंधित शिक्षकावर गैरवर्तनाचा आरोप झाला होता. त्यावेळी ग्रामस्थ, पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात समजूतीने निर्णय घेऊन त्या शिक्षकाला शाळेत पुन्हा घेण्यात येणार नाही असे ठरवण्यात आले होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र सोमवारी १६ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी संशयित आरोपी बलवंत मोहिते हा वादग्रस्त शिक्षक अचानक शाळेत हजर झाल्याचे दिसून आले. याबाबत पालकांना कळताच संतप्त पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेवर धडक देत या प्रकाराचा निषेध केला आणि शाळा प्रशासनाला जाब विचारला.
वातावरण तापू लागल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत नाटे पोलीसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर नाटे पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ शाळेत दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यानूसार गुन्हा दाखल केला व त्या शिक्षकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी त्या शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास नाटे सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर करत आहेत.