राज्यात गेली अनेक वर्षे अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित आदी शाळांमधील स्थगित असलेली शिक्षक भरती अखेर सुरु करण्यात येणार आहे. विविध विषयांची एकूण ६००० पदे लवकरच भरली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या पुढाकाराने भरती प्रक्रीयेला वेग प्राप्त झाला आहे. पवित्र प्रणालीच्या माध्यमातून गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना, सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी असा प्रयत्न राहणार आहे. तसेच राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा विचार करूनच नवीन शिक्षकांची भरती केली जाणार आहे. राज्यातील सर्व अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थां, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय आणि अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयामधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर हि भरती होणार आहे.
त्यासाठी भरतीच्या वेळी शिक्षण सेवक या पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेत अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे. डी.एड., बी.एड., बीपीएड करून सुद्धा काही जन बेरोजगार आहेत, तर काही तुटपुंज्या मानधनावर शिक्षकी पेशामध्ये काम करत आहेत. अनेक खाजगी संस्थांची कडक धोरणे स्वीकारून, नोकरी टिकावी यासाठी एवढ्या प्रमाणात महागाईच्या काळात सुद्धा अनेक जण कमी मानधनात राबत आहेत. अशा शिक्षण सेवकांसाठी हि बातमी नक्कीच एक आशेचा किरण म्हणण्यापेक्षा कवडसा तरी ठरणार आहे.