खेडमध्ये उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. ठाकरे यांना निरोप देण्यासाठी खेड रेल्वे स्थानकावर जमलेल्या शिवसैनिकांनी घोषणा देताना रामदास कदम यांना अपशब्द वापरल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. घोषणाबाजीमुळे वातावरण तापले आणि दोन गट पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले. ठाकरे गट शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांना पोलिसांनी रात्री उशिरा चौकशी करून अटक केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत मोरे व त्यांच्या काही सहकाऱ्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. मंगळवारी (ता. ६) या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.
खेडमध्ये सोमवारी राष्ट्रवादीतून ठाकरे गटात दाखल झालेले माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड रेल्वे स्थानकात उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. ठाकरे वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबईकडे रवाना झाल्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांच्यासह शिवसैनिकांनी पोलिसांकडे उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसैनिकांनी घोषणा देताना रामदास कदम यांना अपशब्द वापरल्याची तक्रार केली. यामुळे खेडमधील वातावरण तापले. याप्रकरणी पोलिसांनी युवासेनेचे अजिंक्य मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने संजय कदम आणि कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मारला.
दरम्यान, अजिंक्य मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकारांना दिली. अजिंक्य मोरेंना अटक केल्याची माहितीही त्यांनी दिली. कोणतीही अनुचित घोषणा शिवसैनिकांनी दिलेली नाही, असा दावा करत संजय कदम पोलिस ठाण्यात गेल्याचे समजताच शिंदे गटाचे काही पदाधिकारीही ठाण्यात आले. दोन्ही गटाचे नेते आमने-सामने आल्यामुळे राजकीय वातावरण अधिकच गरम झाले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांची मंडळी पोलिस ठाण्यात होती. तणावाच्या पार्श्वभूमीवर खेड पोलिसांनी शहरात संचलन केले. आज सकाळी युवा सेनेचे अजिंक्य मोरे यांना खेड येथील न्यायालयात हजर केले असता त्यांची २५ हजारांच्या जामिनावर मुक्तता केली.