विविध प्रकल्प उभारून जिंदल कंपनी पैसा कमवते. मात्र, स्थानिकांचे जगणे मुश्कील होत आहे. त्याचे कंपनीला सोयरसुतक नाही; पण आता कंपनीची दादागिरी सहन केली जाणार नाही. जोवर गॅस टर्मिनलबाबत स्थानिकांना कंपनी विश्वासात घेत नाही, तोवर काम सुरू करायचे नाही, असा सज्जड दम पालकमंत्री उदय सामंत यांनी जिंदल कंपनीच्या अधिकाऱ्यांना भरला. गॅस टँकरची वाहतूक सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत पूर्ण बंद ठेवा आणि रात्रीची वाहतूक करा, असेही कंपनीला सुनावले. जिंदल कंपनीच्या गॅस टर्मिलनबाबत, जयगड-तौसाळ सागरी मार्ग आणि काळबादेवीवासीयांची जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. जयगड येथे यापूर्वी झालेल्या वायू गळतीमुळे शेकडो विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. तेव्हा देखील कंपनी सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीसाठी पुढे आली नाही. कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत स्थानिकांत प्रचंड चीड आहे. यातच कंपनीने जयगड येथे गॅस टर्मिनलचा घाट घातला आहे.
याला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे; परंतु कंपनी विरोध झुगारून टर्मिनलचे बांधकाम करत असल्याचे स्थानिकांनी उघड केले आहे. दरम्यान, सागरी मंडळाने टर्मिनलच्या कामाला स्थगिती देऊनही कंपनी अंतर्गत काम करत असल्याचे उघड झाले. स्थानिकांनी हे काम बंद पाडले. याबाबत सामंत म्हणाले, “कंपनीची दादागिरी वाढतच आहे. कोणत्याही बैठकीला अधिकारी उपस्थित राहत नाहीत. ही मनमानी आणि दादागिरी आता सहन केली जाणार नाही. स्थानिकांना विश्वासात न घेता काम रेटत आहात. जोवर स्थानिकांना विश्वासात घेतले जात नाही, तोवर टर्मिनलचे काम होणार नाही. तुमच्या येणाऱ्या प्रत्येक जहाजाची आता प्रशासन म्हणून कसून तपासणी करून गॅस उतरायचा की नाही ते ठरवावे लागेल. गॅस टँकरच्या वाहतुकीमुळे स्थानिकांना प्रचंड त्रास होत आहे.”
जयगड-तवसाळ सागरी मार्ग – सागरी महामार्गातील सांडेलावगण ते तवसाळ असा पूल उभारला जाणार आहे. त्यासाठी लागणारी जागा देण्यास स्थानिक तयार आहेत; परंतु त्यांना अपेक्षित मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी होती. याबाबत आज पालकमंत्री सामंत यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये स्थानिकांना समाधानकारक मोबदला मिळेल, असे आश्वासन दिले. काही नागरिकांच्या सूचना होत्या त्यावरही विचार केला जाईल, असे सामंत यांनी सांगितले.