शहरालगतच्या भाटी मिऱ्या (मिर्या रोड) येथे शनिवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण तिहेरी दुचाकी अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेसह दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिऱ्या बंदर ते रत्नागिरीकडे जाणाऱ्या मार्गावर सौ. सुप्रिया सचिन बडवे (रा. रत्नागिरी) या त्यांच्या ताब्यातील अॅक्टिव्हा स्कूटर (एमएच ०८ बीजी ६६६९) चालवत होत्या. त्यांच्या मागून मोटारसायकल (एमएच ०९ ईएच १९८३) येत होती. दरम्यान, रत्नागिरीकडून सडामिऱ्याकडे जाणाऱ्या मोटारसायकल (एमएच ०८ बीएच ८४४५) वरील चालकाने भाटी मिऱ्या एस.टी. बसस्थानकाजवळ विरुद्ध दिशेने (राँग साईडने) येत जोरदार धडक दिली. यामध्ये तिन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात संस्कार सरदार कांडर (वय २०, रा. पन्हाळा, कोल्हापूर) याचा जागीच मृत्यू झाला.
तर दिग्विजय विजय पाटील, सौ. सुप्रिया सचिन बडवे, अथर्व संजय भोईर आणि केशव राजबहादुर कुशावत हे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील चार तरुण दोन दुचाकींवरून मालवण येथे पर्यटनासाठी आले होते. मालवणहून परतताना रत्नागिरीत मिऱ्या – बंदर परिसरात फिरून पुन्हा शहरांकडे येत असताना हा अपघात घडला. अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखम ींना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी एका तरुणाचा दातांसह जबडा बाहेर आल्याने अपघाताची तीव्रता अधिकच भयावह होती. घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतली असून मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघाताचा पुढील तपास मिरकरवाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी शिवलकर वरिष्ठांच्या आदेशानुसार करीत आहेत.

