26.2 C
Ratnagiri
Sunday, October 27, 2024
HomeSindhudurgठाकरे शिवसेनेचे 'टार्गेट' बदलले भाजपला गोंजारत राणे, केसरकरांवर टीका

ठाकरे शिवसेनेचे ‘टार्गेट’ बदलले भाजपला गोंजारत राणे, केसरकरांवर टीका

राणे विरुद्ध पारकर म्हणजे भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी पारंपरिक लढत दिसेल.

सिंधुदुर्गात ठाकरे शिवसेनेचे राजकीय टार्गेट अचानक बदलून भाजपऐवजी शिंदे शिवसेना झाली आहे. अगदी चार दिवसांत हे बदल झाले. तीन पैकी दोन मतदारसंघांत दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही राजकीय ‘स्ट्रेटजी’ बदलून ठाकरे शिवसेनेने भाजपला गोंजारण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे टार्गेट आता राणे, केसरकर आणि शिंदे शिवसेना आहेत. सिंधुदुर्गात तीन मतदारसंघ आहेत. यातील केवळ कणकवली मतदारसंघात भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना सामना रंगणार आहे. परंतु, या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार सुरू केला आहे. मात्र, ठाकरे शिवसेनेला उमेदवार जाहीर करण्यास विलंब झाला आहे. कालच (ता.२४) जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना एबी फॉर्म देत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कणकवलीची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येथे राणे विरुद्ध पारकर म्हणजे भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी पारंपरिक लढत दिसेल.

कणकवली मतदारसंघापेक्षा कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघाकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे. कारण सावंतवाडीमध्ये विद्यमान शिक्षणमंत्री दीपक केसरकर विरुद्ध ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत असलेले राजन तेली यांच्यात लढत होत आहे. कुडाळ मतदारसंघातही दोन दिवसांपूर्वीपर्यंत भाजपचे विधानसभा प्रमुख असलेले नीलेश राणे विरुद्ध ठाकरे शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्यात लढत आहे. या दोन्ही मतदारसंघात आमचीच खरी शिवसेना असल्याचे दाखविण्यासाठी मूळ शिवसेनेच्या दोन शखलांचे उमेदवार एकमेकासमोर उभे ठाकले आहेत. सावंतवाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दीपक केसरकर यांना संधी दिली आहे. विजयाची हॅ‌ट्ट्रिक साधलेले केसरकर विजयाचा चौकार मारण्यासाठी मैदानात उतरले आहेत. परंतु, ही निवडणूक केसरकरांसाठी अस्तित्वाची मानली जात आहे. केसरकरही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत. परंतु, त्यांच्यासमोर महायुतीतील स्वकियांचे आवाहन आहे.

१५ वर्षांच्या आमदारकीच्या काळात केसरकरांनी आमच्यावर अन्याय केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांचा आहे. पाच वर्षांत भाजपचे विधानसभा प्रमुख असलेल्या राजन तेली यांनी केसरकर विरोधी वातावरण निर्माण करण्यात भाजपच्या यंत्रणेच्या साहाय्याने यश मिळविले आहे. विशेषतः केसरकर विरोधी वातावरण टिकवून ठेवण्यातही तेलींना यश आले आहे. त्यामुळे महायुतीकडून केसरकरांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट होताच तेलींनी ठाकरे शिवसेनेशी संधान बांधत उमेदवारी मिळविली आहे. पक्षांतर केल्यानंतर तेली यांनी नारायण राणे कुटुंबावर आरोप केले. मात्र, भाजप विरोधात कोणतेही भाष्य केले नाही. तसेच त्यांनी गेली दहा वर्षे मेहनत घेऊन भाजपमध्ये तयार केलेली फळीही हलविली नाही. कोणाचाही ठाकरे पक्षात प्रवेश घेतला नाही. यामुळे भाजप नाराज होईल. नाराजी झाल्यास मिळणारा अदृष्य पाठिंबा दूर होईल, ही भीती तेलींना होती. त्यामुळे तेलींनी भाजपला टार्गेट केलेले नाही. कुडाळ-मालवण मतदारसंघातही शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत होत आहे. मात्र, यावेळी होणारी लढत हाय व्होल्टेज होणार आहे. कारण लोकसभेप्रमाणे राणे विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी लढत होत आहे.

भाजपचीच डोकेदुखी वाढली – सावंतवाडी आणि कुडाळ मतदारसंघ शिवसेनेला सुटले आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजप कमक चिन्हासाठी आग्रही होती. सावंतवाडीत तर शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराला भाजपच्या काहींचा विरोध आहे, तर कुडाळमध्ये उमेदवाराला विरोध नसला, तरी कमळ चिन्ह न मिळाल्याने नाराजी आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची नाराजी दूर करण्याचे आव्हान भाजप श्रेष्ठींसमोर आहे. यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मंत्री चव्हाण यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास युतीच्या दोन्ही उमेदवारांना फायद्याचे ठरेल; अन्यथा खूप मोठे आव्हान राहणार आहे.

राणेंविरोधात त्यांचेच शिलेदार – जिल्ह्याचा एकूण अभ्यास केल्यास जिल्ह्यात सध्या नारायण राणे विरुद्ध त्यांचे जुने शिलेदार अशी स्थिती आहे. सावंतवाडी विधानसभा लढवीत असलेले राजन तेली, नुकताच ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेले परशुराम उपरकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते हे सर्व प्रमुख जुने शिलेदार सध्या विरोधी म्हणजे ठाकरे शिवसेनेत आहेत. कणकवली विधानसभा लढवीत असलेले संदेश पारकर हे सुद्धा काही काळ राणे यांचे शिलेदार होते. त्यामुळे राणे यांना त्यांच्याच शिलेदारांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तशी रणनीती ठाकरे शिवसेनेने आखली आहे.

नाईकांचीही तोफ सेना, राणेंकडे – याचा सार्वभौम अभ्यास करीत आमदार नाईक यांनीही प्रचाराच्या तोफा भाजपकडून वळवित त्या केवळ शिवसेना आणि राणे यांच्या विरोधात सुरू केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात भाजपला विशेषतः भाजपचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जेरीस आणण्याचे काम आमदार नाईक यांनी केले होते. भाजपविरोधात मालवण शहरात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला होता. चार दिवसांपूर्वी पर्यंत आमदार नाईक यांच्या प्रमुख टार्गेटवर भाजप होते. परंतु, नीलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट होताच नाईक यांनी भाजपला सॉफ्ट कॉर्नर देण्यास सुरुवात केली आहे.

नाईकांना हवी भाजपची साथ? – उमेदवारी अर्ज भरताना झालेल्या भाषणातही भाजप नेते किंवा भाजपला विशेष टार्गेट न करता दडपशाही हवी का? असा प्रश्न करीत राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. शिंदे शिवसेनेवर गद्दारकीचा आरोप केला. यातून एकच स्पष्ट होत आहे. २०१४, २०१९ च्या निवडणुकीप्रमाणे नाईक यांना यावेळीही भाजपची साथ हवी आहे. महायुतीची उमेदवारी शिवसेनेला गेल्याने नाराजांचा छुपा पाठिंबा मिळावा, यासाठी प्रचाराची दिशा बदलली आहे. यामध्ये आमदार नाईकांना यश येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चव्हाणांवर केलेले आरोप लक्षात ठेवून भाजपवाले महायुतीचा धर्म पाळतात? हे निकालादिवशी स्पष्ट होईल.

RELATED ARTICLES

Most Popular