रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ठाकरे शिवसेनेसाठी कसोटीचा काळ आहे. वर्षभरात सत्ताधारी भाजप आणि शिंदे शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर ठाकरे सेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. स्थानिक पातळीवरील पदाधिकारीही आता सत्तेकडे आकर्षित होऊ लागले आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेसमोर कार्यकर्त्यांना टिकवण्याचे आणि पक्ष संघटना बळकटीचे आव्हान आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्यातील शहरांचे नगराध्यक्ष आणि प्रभागरचना त्यातील आरक्षण सोडत झाली आहे. त्यामुळे शहरातील कार्यकर्ते कोणत्या पक्षात जायचे, निवडून येण्यासाठी कोणता पक्ष बरा याचा विचार करत आहेत. लवकरच जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणाची आरक्षण सोडत निघेल.
त्यानंतर ग्रामीण भागातील इच्छुकांची घालमेल सुरू होणार आहे. एकेकाळी कोकण हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा बालेकिल्ला होता; मात्र पक्षफुटीनंतर ठाकरे शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही कोकणात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यांच्याकडे पक्षाची धुरा आहे ते नेते जिल्ह्यात कधीतरीच दिसतात. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे आहे; मात्र संघटना बळकटीसाठी स्थानिक नेतृत्वाकडूनही फारसे प्रयत्न झालेले दिसले नाहीत.
पक्षाचे काही पदाधिकारी, नेते जनतेच्या प्रश्नांवर शासन, प्रशासन पातळीवर विविध आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठवताना दिसतात; परंतु पक्षसंघटना वाढीबाबतीत पदाधिकाऱ्यांमध्येच मरगळ असल्याचे दिसत आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील वातावरण शांत होते; मात्र माजी आमदार बाळ माने यांनी रत्नागिरीतील निकृष्ट रस्त्यांच्या विषयावर आणि चिपळूणमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले; मात्र पक्षाचे पद घेतलेले शिवसेनेचे नेते सामान्य लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवताना दिसत नाहीत. काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेसमोर सत्ताधाऱ्यांचे आव्हान आहे.
माजी आमदार, नेते वर्षभरात दुसऱ्या पक्षात – गेल्या वर्षभरात सत्तेतील भाजप आणि शिंदे शिवसेनेत मोठ्या संख्येने ठाकरे शिवसेनेतील पदाधिकारी, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. माजी आमदार संजय कदम, राजन साळवी, सुभाष बने, सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाडिक यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. सत्तेत नसल्याने पक्षाला हा फटका बसत असला तरी पक्षनेतृत्वाकडून मात्र हे थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.