शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यामुळे रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत. नवीन नळपाणी योजनेचा वारंवार बोजवारा उडत आहे. तोडण्यात आलेल्या झाडांचा कचरा वेळेवर उचलला जात नाही. अनेक ठिकाणी गटारं उघडी असून त्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या सारख्या अनेक समस्यांकडे नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेवर धडक दिली आणि प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. दरम्यान नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासकांना निवेदन देऊन १५ दिवसांत या समस्यांचे निराकारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेना उबाठाने दिला आहे.
शिवसेना उबाठाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, संजय पुनस्कर, सलील डाफळे, साजिद पावसकर, माजी नगरसेविका रशिदा गोदड, राजश्री शिवलकर, किरण तोडणकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी बुधवारी सकाळी नगर परिषदेवर धडकले. यावेळी शहरातील विविध प्रश्नांवर मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ता चांगला आहे. परंतु रामआळी, मारुती आळी, तांबट आळी, तेली आळी नाका तसेच अन्य अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या परिसरातही खड्डे आहेत. निवखोल घाटी असो कि पेठकिल्ल्याकडे जाणारा रस्ता अनेक अंतर्गत रस्त्यांची वाताहत झाली आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत.
नवीन नळपाणी योजनेत अद्यापही सुधारणा झालेली नाही, अनेक ठिकाणी ती वारंवार फुटत आहे. विविध केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या मधून काही भागात चर खोदले जात आहेत. हे खोदलेले चर योग्य प्रकारे खडी डांबराने भरले जात नसल्याच्याही तक्रारी असून नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अन्य समस्यांबाबतही ठाकरेंच्या शिवसैनिकांनी प्रशासनाला चांगलाच जाब विचारला.
मी काही रजनीकांत नाही… – मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी उबाठाने दिलेल्या निवेदनावर लक्ष देऊ असे सांगितले. मात्र बोलण्याच्या ओघात आपण काही रजनीकांत नाही की, आपल्या मागे काय चालले आहे हे दिसायला. असे म्हणताच उबाठाचे पदाधिकारी संतप्त झाले व जोरदार शाब्दीक चकमक उडाली. यानंतर शहरप्रमुख साळुंखे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शांत केले. रत्नागिरी शहर स्मार्ट होत असताना मुख्याधिकारीही स्मार्ट असल्याचा टोलाही तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी यावेळी लगावला.