दैनंदिन सेवेत रोखीत उत्पन्न मिळूनही तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाने सध्याच्या मे महिन्यातील गर्दीच्या हंगामात पुरेशा बसेस आणि मागणीप्रमाणे चालक- वाहक पुरवून या संधीचा फायदा घेत उत्पन्नात भर टाकणे आवश्यक असताना वरिष्ठ पातळीवरून तसे कोणतेही प्रयत्न होत नसल्याने सध्या एसटी प्रशासनाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे दिसून येत आहे. राजापूर आगारातील चालक व वाहकांच्या तुटवड्यामुळे दैनंदिन काम काज करताना राजापूर एसटी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.तब्बल ४८ चालक व ४८ वाहक राजापूर आगारात कमी आहेत. शिवाय वर्कशॉपम ध्येही २० कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
काही वेळा ग्रामीण भागात व इतर ठिकाणी जाणाऱ्या गाड्या प्लॅटफॉर्मवर लागलेल्या असतात मात्र अपुऱ्या चालकांमुळे या गाड्या वेळेत सुटत नसल्याने याचा थेट परिणाम दैनंदिन वाहतुकीवर व प्रवासी सेवेवर होत आहे. वाहक-चालकांची कमतरता असतानाही राजापूर आगारातील प्रशासन वेळापत्रक कोलमडणार नाही याची दक्षता घेत आहे हा मोठा दिलासा आहे. सध्यस्थितीत राजापूर आगारातील एसटी बसेसची एकूण संख्या ६४, नियमित ६४ नियते आणि २०० फेऱ्या आहेत. दैनंदिन कामकाजात गरजेपेक्षा कमी चालकवाहकांच्या संख्येमुळे व त्यातच मुंबईला परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांसाठी जादा मुंबई बसेस चालू केलेल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हयात रत्नागिरी व चिपळूण आगारापाठोपाठ मोठे आगार म्हणून राजापूर आगाराचा क्रमांक लागतो. मुंबई, पुणे, कोल्हापूर सांगलीसह ग्रामीण भागात दैनंदिन मोठी प्रवासी वाहतूक राजापूर आगारातून होते. राजापूर आगारात नियमित ६४ नियते व त्यांच्या २०० फे-या आहेत. राजापूर आगारात ६४ गाड्या असून सद्यस्थितीत ४८ चालक व ४८ वाहक कमी आहेत.