चिपळुणात शुक्रवारी मध्यरात्री पासून पावसाने हळुवारपणे सुरुवात केली. रात्रभर सरीवर पाऊस पडत होता. तर शनिवार सकाळपासून मात्र पावसाने दमदार एन्ट्री मारली आणि सायंकाळपर्यंत सलग पाऊस पडत राहिला. त्यामुळे सर्वत्र पाणीचपाणी असे चित्र निर्माण होऊन वातावरणात देखील गारवा जाणवू लागला. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांना प्रचंड आनंद झाला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. फार काळ प्रतीक्षा यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने देखील दांडी मारली होती. १५ मे दरम्यान पडणारा मान्सूनपूर्व पाऊस यावर्षी मात्र पूर्णतः गायब झाला होता. संपूर्ण मे महिना कडकडीत उन्हात व उकड्यात गेल्यानंतर सर्वांना जून महिन्याची प्रतीक्षा होती. दरवर्षी जूनच्या ७ किंवा ८ तारखेला कोकणात मान्सूनचे हमखास आगमन होते. परंतु यावेळी मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले. जून महिना अर्धा संपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि प्रत्येकजण पावसाची प्रतिक्षा करू लागला.
शेतकरी धास्तावले, कोयनेची भीती – पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. रोहिणी नक्षत्रात मे महिन्यात काहीसा मान्सूनपूर्व पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरुवात करतात. परंतु यावेळी संपूर्ण रोहिणी नक्षत्र कोरडा गेला. नाईलाजास्तव काहींनी पेरणी केली तर काहीजण पावसाच्या प्रतीक्षेत राहिले. मृग नक्षत्रात राखण देणे ही कोकणातील मोठी परंपरा राहिली आहे. कडकडीत उन्हातच सर्वांनी राखणीचा कार्यक्रम उरकून घेतला. राखण संपली तरी पाऊस नसल्याने शेतकरी प्रचंड धास्तावले होते.
कोयना धरण आटले – त्यातच कोयना धरणात पाण्याची पातळी खालावल्याचे वृत्त आले. कोयना धरणात फक्त ११ टक्के पाणी साठा उपलब्ध असून जर आगामी काळात पाऊस पडला नाही तर विजेचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. तसेच चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरात भयंकर आशा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार अशी चिंता देखील व्यक्त करण्यात येत होती. साहजिकच सर्वांच्या पोटात भीतीचा गोळा घोंगावत होता.
अखेर मान्सून धारा बरसल्या – हवामान खात्याने २३ जून पासून कोकणात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे २३ जूनकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. २३ जूनला शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी वगळता दिवस तसा कोरडा गेला. परंतु सायंकाळी पावसाळी वातावरण निर्माण झाले. एका बाजूने थंड वारे वाहू लागले त्यामुळे पावसाचा अंदाज पक्का झाला. मध्यरात्री मात्र पावसाने हळुवार सुरुवात केली. पहाटे काहीसा जोर वाढला. रातभर रिमझिम पडलेल्या पावसामुळे मान्सूनचे आगमन निश्चित झाले.
दिवसभर धूमधडाका – शनिवारी सकाळपासून चिपळूणसह साऱ्या जिल्ह्यात पावसाने धुमधडाक्यात सुरुवात केली. विशेष म्हणजे शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र सलग पाऊस पडत होता. दिवसभर पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र निर्माण होऊन वातावरणात देखील गारवा निर्माण झाला. पावसाचा अंदाज येताच शेतकऱ्यांनी लागलीच शेतीत धाव घेतली आणि शेतीच्या कामांना वेग प्राप्त झाला. बाजारात देखील पावसाळी साहित्य खरेदीसाठी सायंकाळी गर्दी दिसून येत होती. एकूणच यावर्षी उशिरा का होईना एन्ट्री मारली त्यामुळे जनजीवन सुखावले आहे.
सरीवर सरी – शनिवारी रत्नागिरी शहरात संपूर्ण जिल्ह्यात चांगला पाऊस पडला. दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. शनिवारी सकाळी रत्नागिरी शहरात पावसाच्या जोरदार सरी पडताच बच्चे कंपनी, खूष झाली. अनेक ठिकाणी त्यांनी भिजण्याचा आनंद घेतल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. साऱ्या जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत असून २४ तासांत १४९ मि.मी. पावसाची नोंद रत्नागिरीत झाली होती.