गेले चार-पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढत असून अनेक ठिकाणी पूर आले आहेत. शेतकऱ्यांची सारी पीके वाहून गेली असून अतोनात नुकसान झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी होत असतानाच आणखी एका संकटाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. फिलिपिन्समध्ये सध्या धुमाकूळ घालणाऱ्या रागासा चक्रीवादळाचा मोठा गंभीर परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून प्रतितास २९५ किमी. वेगाने वारे महाराष्ट्राच्या दिशेने घोंगावत आहेत. त्यामुळे वादळ तर होईलच, परंतु त्याचवेळी ३० सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा कहर पहायला मिळू शकतो. पॅसिफिक महासागरात ‘रागासा’ चक्रीवादळ घोंगावत आहे. या चक्रीवादळाला ‘टायफून’ म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वांत तीव्र हे वादळ आहे. या वादळाचा परिणाम बंगालच्या उपसागरात दाखल झाला आहे. २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबरदरम्यान या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळ येऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पावसाचा कहर – बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र आधीच तयार झालं आहे. दर तीन दिवसांनी या कमी दाबाच्या पट्ट्यात बदल होत असून रविवारपर्यंत हा पट्टा अधिक तीव्र होईल आणि ओडिशा, आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर वादळ धडकण्याची शक्यता आहे. कदाचित हे वादळ महाराष्ट्रात धडकेल, असा अंदाज आहे. महाराष्ट्रात वादळ जरी धडकले नाही, तरी त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत पावसाचा कहर पहायला मिळू शकतो.
मुंबईसह कोकणात अतिवृष्टी? – परिणामी मुंबईसह संपूर्ण कोकणात आणि लगतच्या गोव्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अतिवृष्टीची-शक्यताही नाकारता येत नाही.