रेल्वेत चढण्यावरून वादावादी झाल्याने एका माथेफिरूने सहप्रवाशांनाच पेटवून दिल्याची घटना रविवार दि. २ एप्रिल रोजी रात्री ९.५० वा.च्या सुमारास कोझीकोड स्थानकाजवळ घडली होती. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता तर ९ जण गंभीर जखमी झाले. डब्यात आग लागल्याने ३ प्रवाशांनी रेल्वेतून उडी मारली होती. यात लहान मुलासह दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांना रुळाजवळ एक बॅग मिळाली. त्यात पेट्रोल आणि २ मोबाईल होते. या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात असावा अशी पोलिसांना शंका होती. त्यादृष्टीने पुढचा तपास सुरू करण्यात आला होता.
रेल्वेतून उडी मारून पळाला ही :- रेल्वे कोरापुझा नदीजवळ एका पुलावर थांबली असता ३० वर्षीय तरूणाने उडी मारली. त्यानंतर धावत धावत तो रस्त्याकडे गेला. त्याठिकाणी दुसरा तरूण दुचाकी घेऊन त्याची वाट पाहत होता. त्याला घेऊन तो निघून गेला. एका घराच्या सीसीटीव्हीत हा सारा प्रकार कैद झाला. यामुळे ही घटना म्हणजे एक सुनियोजित हल्ला असल्याचे समोर आले. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या प्रकरणाचा शोध केंद्रीय गुप्तचर यंत्रणा करत होती. हल्लेखोराचे नाव शाहरूख सैफी असे असल्याचे समोर आले होते. तसेच तो अजमेरच्या दिशेने पळाल्याचेही समजले होते. त्यानुसार केंद्रीय गुप्तचर यंत्रणा शोधकार्याला लागली होती.
महाराष्ट्र शेवटचे लोकेशन:- सोमवारपासून हल्लेखोराचा मोबाईल बंद होता. त्यामुळे तो नेमका कुठे आहे हे कळत नव्हते. मात्र महाराष्ट्र हे शेवटचे लोकेशन मिळत होते. यामुळे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने महाराष्ट्र एटीएसची मदत घेतली आणि हल्लेखोराचा महाराष्ट्रात शोध सुरू झाला. दरम्यान अजमेरच्या दिशेने जात असताना हल्लेखोर शाहरूख करंजारी रेल्वेस्थानकादरम्यान धावत्या ट्रेनमधून खाली पडला. त्याला दुखापत झाली होती. रेल्वे ट्रॅकनजीक घरे असलेल्या ग्रामस्थांनी त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. त्याला नजीकच्या रूग्णालयात दाखल केले.
डॉक्टरवरच हल्ला:- रुग्णालयात दाखल झालेली व्यक्ती नेमकी कोण आहे हे कोणालाही ठाऊक नव्हते. त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला रत्नागिरीत पाठवण्यात आले. या प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेतील डॉक्टरवर हल्ला करून तो रूग्णवाहिकेतून पळून गेला. यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पोलिसांना खबर दिली. महामार्ग पोलिसांनीही शोधमोहीम सुरू केली.
जिल्हा रूग्णालयातून पळाला:- सावर्डे येथील पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले. त्याची पुन्हा वैद्यकीय तपासणी केली व रूग्णवाहिकेतून पुन्हा त्याला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी तो पुन्हा एकदा जिल्हा रूग्णालयातून पळून गेला. रूग्ण पळाल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. पोलीस चौकीतही कळवण्यात आले. इतका सर्व प्रकार होईपर्यंत हा रूग्ण नेमका कोण आहे हे कोणालाच ठाऊक नव्हते.
आणि लोकेशन सापडले:- जिल्हा रूग्णालयातून पळाल्यानंतर शाहरूखने आपला मोबाईल सुरू केला आणि त्याचे लोकेशन रत्नागिरीत दिसून आले. केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसने आपला सापळा रचला. तो रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या दिशेने गेला होता.रेल्वेने पळ काढण्याच्या तयारीत असतानाच मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याला ताब्यात घेतल्यानंतर गेले २ दिवस रत्नागिरीत उच्छाद मांडणारा जखमी तरूण केरळमधील हल्लेखोर असल्याचे समोर आले. त्याला आता केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.