वेळ सकाळी सातची. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० फुटी ध्वजस्तंभ.. प्रत्येकाच्या हातात झाडू… प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, अनावश्यक वाढलेली झाडे… बघता-बघता कचऱ्याचा ढीग जमू लागला. प्रत्येकजण झपाटल्यासारखा साफसफाई करत होता. निमित्त होते ते महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत कार्यालयीन स्वच्छतेचे. जिल्हाधिकारी स्वतः झाडू घेऊन मोहिमेत उतरल्यामुळे अधिकारी, कर्मचारीही तेवढ्याच उत्साहाने काम करताना पाहायला मिळाले. ‘एक तारीख, एक तास’ या निमित्ताने रविवारी १ ऑक्टोबरला शहर परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे.
आजच्या मोहिमेमध्ये जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी डॉ. जस्मिन, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, प्रांताधिकारी जीवन देसाई, प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. अधिकारी, कर्मचारी यांनी श्रमदानातून जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय परिसराची स्वच्छता केली.
पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, सर्व स्वच्छता कर्मचारी, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, स्वीय सहाय्यक तथा नायब तहसीलदार संदीप सावंत यांच्यासह महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी जिल्हा हा स्वच्छ आणि सुंदर आहे. इतर जिल्ह्यांमध्ये शासकीय कार्यालयातील कोपरे आणि भिंती रंगलेल्या पाहायला मिळतात. असा प्रकार इथे जवळपास नाही. जिल्ह्याचे नागरिकदेखील स्वच्छतेला महत्व देतात. जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांच्यासारखे अधिकारी आपल्या परिसराचे सुशोभीकरण करून वेगळे अस्तित्व निर्माण करतात.
अधीक्षक, जिल्हा परिषद कार्यालय स्वच्छ – स्वच्छता ही सेवा, स्वच्छता पंधरवडा आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त पोलिस अधीक्षक कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय परिसराची स्वच्छता केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हा परिषद परिसर कार्यालयांची स्वच्छता केली.