26.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriजिल्ह्यास मिळणार १४५० प्राथमिक शिक्षक

जिल्ह्यास मिळणार १४५० प्राथमिक शिक्षक

जिल्ह्यात १ हजार ७६६ मराठी तर १४७ उर्दू माध्यमातील शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीसाठी प्रशासन सज्ज आहे. विभागीय आयुक्त पातळीवरून रोस्टर तपासून झाले आहे. जिल्ह्यातील एकूण पदांपैकी ८० टक्के रिक्त पदे भरण्यास हिरवा कंदीलही मिळाला आहे; मात्र राज्यातील पाच ते सहा जिल्ह्यांतील ऑनलाईन नोंदणीला विलंब झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया रखडली आहे. या भरतीमुळे सुमारे साडेचौदाशेहून अधिक प्राथमिक शिक्षकांची पदे भरली जातील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. मागील काही वर्षात शिक्षक भरती न झाल्यामुळे दरवर्षी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे वाढतच आहेत. गतवर्षी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्यानंतर राज्यभरातून लोकांमध्ये सरकारविषयी नकारात्मक भूमिका तयार होऊ लागली.

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची संख्या दोन हजारावर पोचली होती. त्यामुळे विरोधकांकडूनही हल्लाबोल झाला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मानधन तत्त्वावर शिक्षक नेमले. त्यानंतर राज्यस्तरावरूनच नियमित रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून कार्यवाही सुरू झाली. शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर ऑनलाईन भरावयाची होती. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून रोस्टर तपासून रिक्त पदे निश्चित करून घ्यावयाची होती. ही प्रक्रिया ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते; परंतु अजूनही राज्यातील सुमारे सहा जिल्ह्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केलेली नाही.

रत्नागिरी जिल्हा परिषदेची रोस्टर तपासणी आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडून करून घेण्यात आली आहे. जिल्ह्यात १ हजार ७६६ मराठी तर १४७ उर्दू माध्यमातील शिक्षकांची पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे भरण्यास मान्यताही दिली गेली आहे. त्यामुळे पवित्र पोर्टलवर भरण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्याला सुमारे साडेचौदाशे नवीन शिक्षक मिळणार आहेत. भरतीची प्रक्रिया राज्यात एकाचवेळी केली जाणार असल्याने आणखीन दोन महिने जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी लागतील, असा अंदाज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular