कोकणात मासेमारी हंगामाला दोन दिवसांत सुरुवात होणार आहे; मात्र किनारपट्टी भागात वादळीवारे आणि पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. मंगळवारी देखील किनारपट्टीसह अनेक भागात मुसळधार पावसासह वादळीवाऱ्यांनी हजेरी लावली. त्यामुळे १ ऑगस्टचा मासेमारीचा मुहूर्त टळण्याची शक्यताच मच्छीमारांमधून व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिने कोकण किनारपट्टीवर मासेमारी बंद होती. त्यामुळे मच्छीमारांनी त्यांच्या बोटी किनारपट्टीला शाकारून ठेवल्या होत्या. मासेमारी बंदीचा कालावधी ३१ जुलैला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे मासेमारीच्या नव्या हंगामाची मच्छीमार सुरुवात करणार आहेत. यासाठी लगबग सुरू झाली आहे. बोटीची डागडुजी आणि रंगरंगोटी आणि मच्छीमार जाळ्यांची देखभाल दुरुस्तीची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. डिझेल, बर्फ, अन्नधान्य याची जमवाजमव सध्या सुरू आहे. किनाऱ्यावर जाळी विणणे, होड्यांना तेल लावणे, बोर्ड रंगवणेसारखी कामे सुरू आहेत; मात्र जिल्ह्यात गेले चार दिवस वेगवान वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला आहे.
या परिस्थितीत मासेमारीसाठी समुद्रात जायचे की, नाही याबाबत अनेक मच्छीमारांमध्ये संभ्रम आहे. काहींनी नौका किनाऱ्यावरच ठेवलेल्या आहेत. त्यामुळे १ ऑगस्टचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे. अवघ्या हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्याच मासेमारी नौकांनी समुद्रावर स्वार होण्याची तयारी पूर्ण केली आहे. दरवर्षी समुद्रात भरपूर मच्छी मिळू दे आणि नुकसान टळू दे, अशी मनोभावे प्रार्थना करून तसेच मुहूर्त काढून पूजाअर्चा करून मासेमारी होड्या समुद्रात सोडल्या जातात. काहीजण नारळी पौर्णिमेनंतर आपल्या बोटी पाण्यात उतरवत असतात. त्यामुळे यंदा मोजक्या बोटीच १ तारखेला मासेमारीला जातील, अशी शक्यता मच्छीमारांकडूनच वर्तवण्यात येत आहे.
मोजक्याच नौकांची तयारी पूर्ण – किनारपट्टी भागात वादळीवारे आणि पावसाचा जोर अद्याप कमी झालेला नाही. आज देखील किनारपट्टीसह अनेक भागात मुसळधार पावसासह वादळीवाऱ्यांनी हजेरी लावली. अवघ्या हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्याच मासेमारी नौकांनी समुद्रावर स्वार होण्याची तयारी पूर्ण केली आहे.