रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे-नाखरेकरवाडी येथे अतिवृष्टीमुळे सार्वजनिक विहीर खचल्याने जवळच राहणाऱ्या विजय नाखरेकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. ती विहीर तातडीने भराव टाकून बुजवण्याची कार्यवाही सुरू झाली; परंतु शेजाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर कार्यवाही थांबली. याची तहसीलदार प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नाखरेकर कुटुंबीयांनी केली आहे. नाखरेकरवाडी येथे गेल्या २३ जुलैला पडीक सार्वजनिक विहीर खचण्याची ही घटना घडली होती. त्या घटनेची तहसीलदार राजाराम म्हात्रे तसेच पोलिस यंत्रणेचे अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत मिरजोळेचे सरपंच, सदस्य यांनीही पाहणी केली होती.
नाखरेकर यांच्या लगत असणाऱ्या घराला असलेला धोका लक्षात घेत तहसीलदार स्तरावरून खचलेली विहीर तत्काळ बुजवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार विहिरीत मातीचा भराव टाकून बुजवण्याचे काम सुरू झाले होते; पण हे काम २५ जुलैपासून तेथील शेजाऱ्यांच्या वादानंतर थांबवण्यात आलेले आहे. त्याबाबत नाखरेकर यांनी ११२ नंबरला तक्रारही दिलेली आहे. ग्रामपंचायत स्तरावरून हे थांबलेले काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण आठवडा उलटूनही त्यावर कार्यवाही न झाल्याने नाखरेकर यांच्या घराला निर्माण झालेला धोका कायम राहिला आहे. आगामी काळात घराचे नुकसान झाल्यास संबंधित यंत्रणा व या कामाला विरोध करणारे जबाबदार राहतील, असा आक्षेप नाखरेकर कुटुंबीयांनी केला आहे.