26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriटेरववासीयांचे आंदोलन उपोषणकर्त्यांनी पाणी पिणेही केले बंद

टेरववासीयांचे आंदोलन उपोषणकर्त्यांनी पाणी पिणेही केले बंद

जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी यापूर्वीच तक्रारी केल्या होत्या.

टेरव ग्रामस्थ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी बेमुदत उपोषण आणखी तीव्र केले आहे. उपोषणकर्त्यांनी आता पाणीही घेणे थांबवले आहे. सोमवारी (ता. ११) सायंकाळी गटविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी केलेली चर्चाही फिस्कटली आहे. जलजीवन मिशन आणि ग्रामपंचायत कारभारप्रश्नी नुसत्या पोकळ आश्वासनांचा कंटाळा आला आहे, आता ठोस कारवाई हवी, अशी आंदोलकांनी मागणी केली. वयोवृद्ध उपोषणकर्त्यांनी पाणीही नाही आंदोलन सुरू केल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. टेरव येथील जलजीवन मिशनमधील पाणी योजना आणि ग्रामपंचायत कारभारप्रश्नी टेरव ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला यश येत नसल्याने थेट तालुकाप्रमुखांनी उपोषणात सहभागी होत अन्न, पाणी त्याग आंदोलन सुरू केले आहे.

या वेळी सावंत म्हणाले, जलजीवन मिशन तसेच ग्रामपंचायत कारभारप्रश्नी झालेल्या चौकशीत संबंधितांवर दोषारोप ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने उपोषणयांशी केलेल्या पत्रव्यवहारातच या बाबी उघड झाल्या आहेत. आम्ही कारवाई करतो, उपोषण मागे घ्या, अशी साद घातली जाते. टेरव ग्रामस्थ गेल्या सहा ते सात महिन्यांपासून तक्रारीबाबत पाठपुरावा करत आहेत. चारवेळा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर चौकशी झाली. प्रशासन वेळकाढू धोरण स्वीकारत असून गैरकामे करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी यापूर्वीच तक्रारी केल्या होत्या.

त्यावर वेळीच चौकशी होऊन कारवाईचे आदेश मिळाले असते तर ग्रामस्थांवर बेमुदत उपोषणाची वेळ आली नसती. जलजीवन मिशन तसेच ग्रामपंचायत कारभारप्रश्नी प्रशासनानेच संबंधितांवर कारवाई निश्चित केल्याचे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात निश्चित कारवाई करून त्याचे पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात अडचणी काय, याचा खुलासा अधिकाऱ्यांकडून केला जात नाही. पाणी योजनेत अनियमितता झालीच त्याचबरोबर ग्रामपंचायतीत तत्कालीन पदाधिकारी व ग्रामविकास ‘अधिकाऱ्याने अयोग्य कारभार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. विविध कागदपत्रांची मागणी पाणीपुरवठा तसेच बांधकाम विभागाकडे केली तरी ती दिली जात नाहीत. काही बाबी दडपण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular