कुणी वाघ पाहिला का वाघ? असा प्रश्न पूर्वी आंत्यतिक कुतुहलाने विचारला जात असे…. आणि गमंत म्हणजे अशा … वाघ पाहिलेल्या माणसाचंही कोण कौतुक होत राही. आणि वाघ पाहिलेलासुध्दा तेवढ्याच बहादुरीने त्याच्या सुरस कथा ऐकवत असे. मात्र वाघाचं दर्शन दुर्मिळ असण्याचा काळ आता मागे सरला असून सकाळ दुपार सायंकाळ अशा कोणत्याही प्रहरी वाघोबा तुमच्यासमोर दत्त म्हणून हजर होतील याचा नेम राहिलेला नाही. या अशा वाघांची म्हणजेच बिबट्यांची संख्या अलिकडे इतकी वाढलीय की, … बिबटे उदंड जाहले..! असं म्हणण्याची वेळ आली आहे. लांजा, राजापूर आणि रत्नागिरीचा काही पट्टा या भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वाघांची खानेसुमारी झाली तेव्हा वाघ्र गणनेत पाऊलखुणा ओळखू आलेले आणि त्याअर्थाने नशीबवान ठरलेले बिबटे बाजूला पडलेत आणि नवीनच बिबट्यांची पैदास समोर येताना दिसत आहे. अलिकडे दरदिवशी कोणत्या कोणत्या गावात हे बिबटे सहज नजरेस पडत आहेत. विशेष म्हणजे आपल्या कुटुंब कबिल्यासह बिबटे दर्शन देताना आढळून येत आहेत. एक किंवा दोन बिबटे सर्रास आढळून येत आहेत.
दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास बिबटे जोडीने फिरताना पाहिले आणि टू व्हीलरने प्रवास करणाऱ्यांची अगदी पाचावर धारण बसली लांजा पूर्व ते पश्चिम असा बिबट्यांचा वावर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः लांजा काजरघाटी मार्ग, लांजा साटवली रोड, लांजा जावडे मार्ग, लांजा दाभोळे मार्ग, लांजा वाडगाव व भांबेड मार्ग, धुंदरे रस्ता, झापडे कांटे मार्ग या मार्गावर बिबट्या तुम्हाला हमखास दर्शन देतोच असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. सहज मि ळणाऱ्या भक्ष्याच्या शोधात बिबटे वाडी वस्ती जवळ संचार करताना दिसून येत आहे. एरवी वाघांविषयी मिजाशीत बोलणारी मंडळींसुध्दा वाघांच्या अशा सहज फिरण्यामुळे टरकून गेले आहेत. वाघांच्या मुक्त संचाराचा सर्वाधिक फटका गरीब शेतकऱ्यांना बसत असून वाघांच्या शिकारीमुळे पशुधन संकटात सापडले आहे. तुम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याची हल्लूयांची खबर का देत नाही असे पश्चिम राजापुरातील एका मेंढपाळ शेतकऱ्याला विचारले असता, कोण त्या जमेल्यात पडणार? ते प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागणार…, असे त्या शेतकऱ्याने सांगितले.

 
                                    