तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे गुढ वाढले असून मृत महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दापोली तालुक्यातील वणंद येथील भाग्यश्री दशरथ लोवरे (वय ५०, रा. लोवरेवाड़ी, वणंद) यांचा मृतदेह मंगळवार दि. २१ मे रोजी सकाळी १० ‘वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी निर्वस्त्र अवस्थेत शेजाऱ्यांना आढळून आला होता. भाग्यश्री लोवरे यांच्या घराशेजारी राहणारी एक महिला सकाळी ९ वाजताच्या सुमारास फुले काढण्यासाठी गेली होती. यावेळी भाग्यश्री यांना नेहमी प्रमाणे आवाज दिला.
मात्र आतून कोणताही प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. त्यांनी वाडीतील अन्य लोकांना याची कल्पना दिली. वाडीतील लोकं आले व त्यांनी दरवाजा उघडला. यावेळी भाग्यश्री या उताण्या अवस्थेत निर्वस्त्रपणे निपचीत पडलेल्या दिसल्या. त्यांनी तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घरात निपचीत पडलेल्या भाग्यश्री यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. अंगावरील कपडे इतरस्त्र पडले होते. त्यांची एक चप्पल घरात होती तर दुसरी घराबाहेर पडलेली होती. त्या रविवारी काहींच्या निदर्शनास आल्या होत्या.
मात्र मंगळवारी सकाळपर्यंत त्यांचा मागमुसही नव्हता. भाग्यश्री या विधवा असून त्यांचा मुलगा, सून व मुलगी मुंबई येथे कामानिमित्त राहतात. त्यामुळे त्या वणंद येथील आपल्या घरात एकटयाच राहत होत्या. त्यांचा मृतदेह आढळून आल्याने नातेवाईकांनी हा आकस्मिक मृत्यू नसून घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, दापोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या मृत्यूचे गुढ उकलणार असून सर्वांचे लक्ष अहवालाकडे लागले आहे तर भाग्यश्री यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.