कोत्रेवाडीलगत कचरा टाकण्यासाठी जी जमीन घेतली आहे ती नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभारामुळे घ्यावी लागली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आला. जागेसाठी जे भाडे द्यावे लागत आहे ते लांजावासीयांच्या करातून देण्यात येत आहे. ही लांजावासीयांची लूट आहे. त्यामुळे घनकचरा प्रकल्पासाठी जी जमीन घेतली आहे त्याचे भाडे मुख्याधिकारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात करून घ्यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. लांजा नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्प जमिनीचे भाडे मुख्याधिकारी व अधिकारी यांच्या पगारातून वसूल करण्याची ही मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने केली असून, यासाठी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले. नगरपंचायतीने घनकचरा प्रकल्पासाठी कोत्रेवाडीलगत २०२४च्या लोकसभा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जमीन खरेदी केली आहे. तेव्हापासून त्या जमिनीमध्ये घनकचरा प्रकल्प व्यवस्थापनाचे कोणतेही काम सुरू नाही.
नगरपंचायतीने शासकीय नियमानुसार खरेदी केली असेल तर त्या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यासाठी का वेळ लागत आहे ? नगरपंचायतीने सर्व नियम डावलून चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी केली आहे. तसेच घनकचरा प्रकल्पासाठी जमीन देणे हे कोणालाही बंधनकारक नव्हते. तरीही नगरपंचायतीने जमीनमालकाला वाढीव भाव का दिला? तसेच लांजा कोत्रेवाडीतील जनतेचे गेले पन्नास दिवस तहसील कार्यालयासमोर या डंपिंग ग्राउंडविरोधात उपोषण चालू आहे, तरी याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. लांजावासीयांचा कररूपी पैसा कचऱ्यामध्ये टाकण्याचा प्रकार सुरू केला आहे, हे योग्य नाही. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया फ्रंट, दाजी गडहिरे, तालुका युवक अध्यक्ष बाबा धावणे, अभिजित राजेशिर्के, पिंट्या माजळकर आदी उपस्थित होते.