बारसू – सोलगाव पंचक्रोशीसह संपूर्ण कोकणातून रिफायनरीला विरोध होत आहे. त्यामुळे कोकणातून रिफायनरी हद्दपार केल्याशिवाय रिफायनरी विरोध मावळणार नाही असा टोला ना. उदय सामंत यांना रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांनी पत्रकारांशी बोलताना मारला. राजापूर तालुक्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरीला आता स्थानिक जनतेचा विरोध मावळत असून बारसू रिफायनरी होणार अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली होती. त्यावर अशोक वालम बोलत होते. पूर्वी नाणार त्या नंतर बरासू सोलगाव पंचक्रोशीत रिफायनरी प्रकल्पाला विरोध होत होता. आता कोकणात रिफायनरी का नको, अशी आमची भूमिका आहे. आधी राजापूर पुरता असणाऱ्या विरोधाची व्याप्ती वाढली असल्याचे श्री. वालम यांनी सांगितले.
कोकणाचे नैसर्गिक साधनसंपत्ती जपून विकास करायचा आहे. कोकणातील बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाची कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना करून पर्यावरण पूरक व्यवसाय आणावेत अशी मागणी सरकार कडे केली आहे. त्यामुळे कोकणातून रिफायनरी हद्दपार करणारच अशी ग्वाही अशोक वालम यांनी दिली.रिफायनरी विरोध मावळत असल्याच्या माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतः बारसू सोलगाव पंचक्रोशीतील जनतेची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी, म्हणजे रिफायनरी विरोध मावळला की वाढला याचा अंदाज घेता येईल असा सल्ला अशोक वालम यांनी दिला. रिफायनरी विरोधी आंदोलकांमध्यें फूट पाडण्यासाठी रिफायनरी समर्थक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश येणार नाही. उलट पत्रकार शशिकांत वरिशे यांच्या घातपात प्रकरणाने रिफायनरी विरोध अधिक वाढत आहे. याचा प्रत्यय कोकणातील शिमागा उत्सवात आला असल्याचे अशोक वालम यांनी सांगितले.