रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा- मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवारच निवडणूक लढवेल. तसेच रत्नागिरी- संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणूनच धनुष्यबाण चिन्हावर आपण निवडणूक लढवणार असल्याचे ना. उदय सामंत यांनी शनिवारी नाट्यगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.नुकतीचं ना. सामंत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे उलट सुलट राजकीय चर्चांना ऊत आला होता. दरम्यान याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना या भेटीमध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना त्यांनी खा. शरद पवार, आ. अजित पवार यांच्या भाषणाची तुलना केली. या नेत्यांची भाषणे पहा आणि प्रत्येक सभांमधून खोके घेतले म्हणून टीका करणारे आणि गद्दार म्हणणाऱ्यांची भाषणे पहा, असा टोला त्यांनी लगावला.
नव्याने सुरू झालेल्या भारती शिपयार्ड कंपनीत शिप ब्रेकिंगचे काम लवकरच सुरू होईल तर वेरॉन कंपनीही येत्या २ आठवड्यात सुरू होईल. जिल्ह्यात अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती सुरू करायच्या आहेत. मरीन पार्क, मँगो पार्क, इलेक्ट्रिक व्हेईकल उद्योग लवकरच जिल्ह्यात सुरू होतील असेही ना. सामंत यांनी सांगितले.रत्नागिरी तालुक्यातील निवळी जयगड मार्गाच्या चौपदीकरणासाठीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे दिला आहे. या भागात जिंदाल, आंग्रे, लावगण डॉकयार्ड अशी बंदरे आहेत. त्यांच्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने या चौपदरी मार्गाची गरज असल्याचे ते म्हणाले.स्टरलाईट प्रकल्पाच्या जागेचा विषय न्यायालयीन असल्याने त्यावर निर्णय घेता येत नाही. प्रकल्पग्रस्तांबाबत आम्हाला सहानुभूती आहे, असेही ना. सामंत यांनी सांगितले.