समस्त राजापूरवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या धोपेश्वर येथील श्रीदेव धुतपापेश्वर मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच मार्गी लावावे असे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रविवारी प्रशासनाला दिले. पुरातन आणि ऐतिहासिक वारसा आणि ठेवा असलेल्या या मंदिर जिर्णोध्दाराचे काम हे शासनाच्यावतीने रत्नागिरी जिल्हयात होत असलेले हे पहिलेच काम आहे. त्यामुळे ते दर्जेदार तर झाले पाहिजेच पण ऐतिहासिक वारसा जपून झाले पाहिजे, त्यामुळे स्थानिकांच्या सूचनांचा आदर करून, त्यांना विश्वासात घेऊनच हे काम मार्गी करावे अशा सक्त सूचना ना. सामंत यांनी एमएमआरडीचे अधिकारी, स्थानिक प्रशासन व संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्या.
शासनाकडून राज्यातील पुरातन व प्रमुख मंदिरे जतन व संरक्षित करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हयातील राजापुरातील श्रीदेव धुतपापेश्वर मंदिराचा समावेश आहे. यासाठी सुमारे , ११ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी व स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी रविवारी ना. सामंत हे घोपेश्वर गावात आले होते. याप्रसंगी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी काम करताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, योग्य प्रकारे काम केले जात नाही अशा तक्रारी केल्या, तर धोपेश्वर इनाम सातबारा सदरी दुरूस्ती होऊनही प्रशासनाकडून त्याबाबत अमल होत नसल्याचे सांगितले.
यावेळी ना. सामंत यांनी या मंदिराचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊनच करावे लागेल असे नमूद करत अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १२ वाड्यांतील ग्राम स्थांची एक समिती गठीत करण्याचे निर्देश यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांना दिले. प्रांताधिकारी याचे निमंत्रक राहणार असून मंदिर प्रशासकांसह या समितीत गावातील सर्व स्तरातील लोकांना सामावून घेऊन एक समिती गठीत करा आणि या समितीच्या नियंत्रणाखाली मंदिर जिर्णोध्दारासह धार्मिक सोहळयांचे नियोजन काम चालेल अशा सूचना केल्या. यावेळी आगामी होणाऱ्या गावाच्या बैठकीत सदस्यांची नावे निश्चित करून कळविण्यात येतील असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.