गेले ४ दिवस धो धो कोसळणाऱ्या पावसाने कोल्हापूरसह सांगली, साताऱ्याला तर झोडपून काढलेच त्याच जोडीला सोलापूरमध्येही धुमाकूळ घातला आहे. पंढरपुरातही चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे देवळे पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्यात तर पावसाने हाहाकार माजविला असून धाराशिव आणि बीडमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. बीड आणि सोलापूरसह धाराशिवमध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी लष्कराची हेलिकॉप्टर्स बोलावण्यात आली आहेत. मराठवाड्यात तर पावसाने वाट लावली असून अनेकांची शेते पाण्याखाली गेली आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे, शेतीतही पाणीच पाणी असून हे सर्व पाहून हताश झालेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातही पाणी ओघळते आहे. मंगळवारी सायंकाळी उशीरापर्यंत हाती आलेल्या माहितीप्रमाणे आजवर या पावसाने मराठवाड्यात ८ जणांचा बळी घेतला असून सोलापूर आणि धाराशिवमध्ये प्रत्येकी एका शेतकऱ्याचा मृत्यू ओढवला आहे.
दरम्यान राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. गेले ४ दिवस पाऊस कोसळत आहे. बीडमध्ये हाहाकार माजला असून अनेकांची शेते वाहून गेली आहेत. म ाजलगावमध्ये अतिवृष्टी झाली असून धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. अनेक गावांमधील घरांमध्ये पाणी घुसले असून अनेक झोपड्या वाहून गेल्या आहेत. सोलापूरमध्येही भयानक पूरस्थिती असून २९ गावे पुराच्या वेढ्यात आहेत. मदतीसाठी एनडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. लष्करालाही बोलावण्यात आले आहे.
पंढरपूरमध्ये मंदिरे पाण्याखाली – पंढरपूरमध्ये चंद्रभागेला पूर आला असून विठ्ठल मंदिर परिसरात असणारी छोटी छोटी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
पंचगंगेला पूर – कोल्हापूरमध्ये पूरस्थिती नियंत्रणात आहे, परंतु पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे, आणि एनडीआरएफ, लष्कर व नौदलाची पथके मदतीसाठी दाखल झाली आहेत. पंचगंगा नदीची पातळी धोक्याच्या पातळीवर गेली आहे आणि अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणा, दूधगंगा आणि राधानगरी धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे, त्यामुळे नदीच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासनाने २५४ कुटुंबांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.
मराठवाड्यात हाहाकार – मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांम ध्ये पावसाने हाहाकार माजविला आहे. बीड आणि धाराशिवला सर्वाधिक तडाखा बसला आहे. बीडमध्ये म ाजलगावमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनता त्रस्त झाली आहे. शेकडो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जालन्यामध्ये सावंगी नदीला आलेल्या पुरामुळे पाणी शेतीत घुसले आहे.
तातडीची मदत – दरम्यान राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत पावसाच्या स्थितीचा आणि झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात मदतकार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी काही भागांमध्ये पाहणी करणार आहेत. दरम्यान शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने २,२१५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून येत्या ४ दिवसांत हे पैसे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

