मिऱ्या, शिरगाव, निवळीसह एकूण ३७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाने गती घेतली आहे. १३५ कोटी ७३ लाख रुपयांची ही नळपाणी योजना असून त्यासाठी वळके मराठवाडी व साठरे ठोंबरेवाडी येथे कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात येणार आहे. रत्नागिरीलगतच्या गावांचाही पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री व स्थानिक आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरीवासीयांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांकडे लक्ष दिले आहे ३७ गावांमध्ये उन्हाळ्यात येणाऱ्या कमीजास्त पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. दररोज माणशी ५५ लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.
मिऱ्या, शिरगाव ते निवळी तिठापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गावांचा समावेश यात करण्यात आला आहे. मागील काही वर्षात साळवी स्टॉप ते निवळी तिठापर्यंत शहरीकरण वाढत असून लोकवस्तीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना सुविधा देण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी विशेष लक्ष दिले आहे. १३५ कोटी ७३ लाखाची ही योजना असून या योजनेसाठी बावनदीवर वळके मराठवाडी येथे ६ मीटर उंच कोल्हापूर टाईप बंधारा बांधला जात आहे. त्यानंतर भविष्यातील मागणी विचारात घेऊन आणखी पाण्यासाठी साठरे ठोंबरेवाडी नजीक दुसरा बंधारा बांधला जाणार आहे. या धरणांवर १३ मीटर व्यास व १३ मीटर खोलीची जॅकवेल उभारली जाणार आहे. त्याठिकाणी २७० हॉर्सपॉवरच्या तीन पंपातून सुमारे ७ किलोमीटर अंतरावर वेळवंड येथे जलशुद्धीकरण केंद्रात आणून ते पुढे आणले जाणार आहे.