जिल्ह्यात काही महिन्यांपासून एकापेक्षा एक भयंकर घटना घडत आहेत. त्यामध्ये खून, चोरी, आत्महत्या यांसारखे प्रकार अधिक बळावत आहेत. त्यामुळे पोलीस देखील सतर्क राहून नागरिकांना जागरूक करताना दिसत आहेत. पाठोपाठ घडणाऱ्या अशा घटनांमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील नाणीज बस थांब्यानजीक सरोदेवाडी येथे घरात एकटी महिला असल्याचा फायदा उठवून, चोरट्याने घरात शिरुन वृद्धेच्या डोक्यात लोखंडी सळी मारुन गंभीर जखमी करत अंगावरील दागिने लंपास केले. हा प्रकार रविवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडला.
विजया विलास केतकर वय ६५ असे जखमी वृद्धेचे नाव असून, त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. विजया केतकर यांच्या पतीचे अपघाती निधन झाले आहे. तर मुले रत्नागिरीला असतात. त्यामुळे त्या घरात एकट्याच राहतात. त्या घरामध्ये एकट्याच राहतात हि गोष्ट ज्ञात असल्याने त्याच्यावर पाळत ठेऊन हा प्रकार घडला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकट्या दुकट्या राहणाऱ्या महिला आणि वृद्धांनी देखील सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
घडलेल्या घटनेमध्ये चोरट्याने मागील दाराने घरामध्ये प्रवेश केला. चोरट्याने स्वयंपाक घरात असलेल्या केतकर यांच्या डोक्यात सळीचे दोन प्रहार केले. त्या रक्तबंबाळ होऊन खाली कोसळताच चोरट्याने त्यांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेतले, तसेच कपाटातील दागिने असे मिळून सुमारे साडेबारा तोळे दागिने घेऊन पोबारा केला. वृद्धेच्या एका हातातील सोन्याच्या बांगड्या त्याला काढता आल्या नाहीत. तर धावपळीत त्याने रिंगा व किरकोळ दागिने वाटेत टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले.