मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खूप चांगला समन्वय आहे. नगरविकास खात्यासंदर्भात फडणवीस कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतात. त्यांच्यात कोणताही वाद नाही; परंतु विरोधकांकडून ही बातमी पसरवली जात आहे, असे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. भारत-पाकिस्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी सामन्यावर आणि सैन्याने भूमिका मांडली आहे. यावर आक्षेप घेणे म्हणजे देशभक्तीवर आक्षेप घेण्यासारखे आहे. सिंदूरवर आक्षेप घेणे, ही नरेंद्र मोदी यांच्यावर नाही तर देशाच्या सैन्यावर टीका आहे. ही टीकाटिप्पणी करणे हाच मोठा देशद्रोह आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. येथील शासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, उपराष्ट्रपतीची निवडणूक आम्ही जिंकलो, या सर्व गोष्टी ठाकरे यांना खटकत आहेत म्हणून उगाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत; परंतु असे काही नाही. फडणवीस आणि शिंदे यांच्यांत चांगला समन्वय आहे. त्यांच्यात कोणताही वाद नसून युतीमध्ये समन्वय नाही, ही बातमी विरोधकांकडून पसरवली जात असून ती पूर्ण खोटी आहे. उद्धव ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर केलेल्या टीकेला सामंत यांनी उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैन्याने या संदर्भात भूमिका मांडली आहे. यावर आक्षेप घेणे म्हणजे देशभक्तीवर आक्षेप घेण्यासारखे आहे.
मंत्रिमंडळात गँगवॉर या ठाकरेंच्या आरोपाला उत्तर देताना सामंत म्हणाले, यामध्ये काहीही तथ्य नाही. विरोधकांनी या आधी काही भाकिते केली होती ती खरी ठरली का? लोकसभा आणि विधानसभेचे भाकीत खरे झाले का? उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकणार असे म्हटले होते; पण ते जिंकले का? असा सवाल करून सामंत म्हणाले, लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ६३ मते कोणाची फुटली, हे पहिल्यांदा महाविकास आघाडीने तपासून पाहावे.
मनसे-उद्धव ठाकरेंच्या युतीची भीती काँग्रेसला – उद्धव ठाकरे आणि मनसेच्या संभाव्य युतीवर काँग्रेसने भीती व्यक्त केल्याच्या प्रश्नावर सामंत म्हणाले, ‘आमच्यासमोर कुठलीही आघाडी असली तरी आम्ही जिंकणार.’ मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची भीती काँग्रेसला असल्याने त्यांनीच त्यावर बोलावे.
ओबीसी आरक्षण अबाधित – ओबीसी समाजाचे आरक्षण कमी केले जाणार नाही. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित आहे. कोणत्याही समाजाच्या तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही करून सरकार सर्व समाजाला न्याय देण्यास कटिबद्ध असल्याचे सामंत यांनी सांगितले.

