राजापूर बाजारपेठेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहेत. वारंवार सूचना करूनही व्यापाऱ्यांकडून अतिक्रमण हटवण्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील अतिक्रमण स्वतःहून हटवण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने केल्या. त्याला एक महिना झाला तरीही बाजारपेठेतील अतिक्रमण जैसे थे आहेत. त्यामुळे अतिक्रमणविरोधात अॅक्शन मोडवर येण्यासाठी पालिका प्रशासनाला केव्हा मुहूर्त मिळणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. राजापूर बाजारपेठ अरूंद जागेत आहे. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा विविध दुकाने व्यापाऱ्यांनी थाटलेली आहेत. व्यापाऱ्यांनी ठिकठिकाणी केलेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्याने वाहने चालवताना कसरत करावी लागते. काहीवेळा दुकानांसमोर या रस्त्यावरच दुचाकी उभ्या केलेल्या असतात. त्यामधून चालणे अशक्य होते.
अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी पावसाळ्यात सुरक्षिततेसाठी उभारलेल्या अतिक्रमणांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अतिक्रमणांकडे लक्ष वेधून सातत्याने पालिका प्रशासनाकडून व्यापाऱ्यांना स्वतःहून अतिक्रमण हटवण्याच्या सूचना केल्या जात आहेत; मात्र, त्या सूचनांना व्यापाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे आता पालिका प्रशासनाने बाजारपेठेतील अतिक्रमणाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील महिन्यामध्ये पालिकेने व्यापाऱ्यांना स्वतःहून अतिक्रमण हटवावे अन्यथा थेट साहित्य जप्त करण्याचा इशारा दिला होता. याला सुमारे एक महिन्याचा कालावधी उलटला तरीही बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण जैसे थे स्थितीमध्ये आहेत.
अतिक्रमण हटावचा केवळ इशाराच – तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी बाजारपेठेतील अतिक्रमणाविरोधात आक्रमक पवित्रा घेत थेट कारवाई केली होती; मात्र त्यानंतर अतिक्रमण हटावचा केवळ इशाराच ठरला. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आताही दिलेल्या सूचना केवळ कागदावरच ठरण्याची शक्यता आहे.