नेलें राववाडी व पाटिलवाडी येथील भर वस्ततीत असलेली ९ बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली आहेत. यापैकी एका घरातील १ लाख २५ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. तर अन्य घरातील सामान विस्कटून टाकले मात्र त्यांच्या हाती पैसे अथवा मौल्यवान वस्तू सापडल्या नाही. ही घटना शनिवारी मध्यरात्री १. ३० वाजल्यानंतर घडली आहे. नेर्ले गावात अशा प्रकारची चोरीची ही पहिलीच घटना घडल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकाचवेळी नऊ घरे चोरट्यांनी फोडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. नवरात्रं उत्सवामुळे सध्या नेर्ले गावातही कार्यक्रम सुरु आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ जागे असतात. शनिवारी सकाळी गणपती मंदिरातील पुजारी यशवंत खानविलकर हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते. त्यांना गणपती मंदिरानजीक असलेले संदीप धनाजी खानविलकर यांच्या बंद घराचा दरवाजा उघडा दिसला, त्यांनी पुढे जाऊन पाहिले त्यांना पुढच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडल्याचे दिसले. त्यांनी याबाबत वाडीतील ग्रामस्थांना माहिती दिली. संदीप खानविलकर यांचे घर चोरट्यांनी फोडल्याची माहिती गावात समजली.
त्यानंतर राववाडी येथील ग्रामस्थांनी आपल्यावाडीतील बंद घरांची पाहणी केली असता, संतोष विठ्ठल खानविलकर, शेखर रघुनाथ खानविलकर, सुनील शिवाजी खानविलकर, अविनाश राजाराम खानविलकर यांच्या मालकीची ही पाच बंद घरे चोरट्याने फोडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. तर नेर्ले पाटीलवाडी येथील शिवाजी भिकाजी पाटील, निनाद श्रीधर पाटील, वसंत पांडुरंग पाटील यांची घरे चोरट्यांनी फोडल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी फोडलेल्या सर्व घरांचे घर मालक हे मुंबईला राहतात. याची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन पाटील, गणेश भोवड, अभिजित तावडे, कृष्णात पडवळ, श्री. रणजित सावंत, श्री. मेथे, जितेंद्र कोलते यांनी तातडीने गावात जाऊन चोरट्यांनी फोडलेल्या सर्व घरांचा पंचनामा केला आहे. संबंधित घर मालकांशी स्थानिक ग्रामस्थांनी संपर्क साधात झालेल्या चोरीच्या घटनेची माहिती दिली आहे. यातील संतोष विठ्ठल खानविलकर यांच्या समोरच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील १ लाख २५ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहेत. हे पैसे घर मालक यांनी दसऱ्यानंतर घराचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी ठेवले होते असे सांगितले आहे. याबाबत या घराची देखभाल करणारे विश्वास राजाराम पाटील यांनी पोलिस ठाणेत तक्रार दिली आहे.
तर अन्य घरातील काही चोरीस गेले आहे का याची नेमकी माहिती संबंधित घर मालक गावी आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र फोडलेल्या घराची पाहणी केल्यानंतर चोरट्यांनी घरातील टी.व्ही किंवा अन्य वस्तुंना हात लावलेला नाही. तर त्यांचा कल हा रोख रक्कम व मौल्यवानवस्तूकडे दिसून येतो आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच श्वान पथकांने गावात भेट दिली. सर्व फोडलेल्या घरात श्वानला फिरवण्यात आले. मात्र श्वान फक्त घरात गुटमळत राहिले. स्थानिकांच्या माहिती नुसार रात्रभर पाऊस पडत होता. तसेच शनिवारी दिवसभर पाऊस होता. यामुळे श्वान चोरट्याचा माग काढण्यात यशस्वी झालेले दिसले नाही. तर ठसे तज्ज्ञ टीमने सुद्धा येऊन सर्व ठिकाणचे ठसे घेतले आहेत. सायंकाळी उशिरा गावात मोबाईल फॉरेन्सिक लॅबची गाडी दाखल झाली होती. चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान वैभववाडी पोलिसांसमोर आहे. यासाठी या मार्गांवरील सि सि टी व्ही. फुटेज तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.