छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा केला जात असून, रत्नागिरी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर पाच गावातील नकाशाबाहेरील रस्त्यांचे सीमांकन करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. रत्नागिरी तालुक्यात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी नियोजन केले आहे. गावांच्या नकाशावर अस्तित्वात नसलेले; परंतु प्रत्यक्षात ग्रामस्थ आणि शेतकरी वापरत असलेले रस्ते आता महसूल अभिलेखात आणण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. सुरुवातीला पाच गावांत हा प्रयोग करण्यात आला असून, त्यात वेद्रेवाडी, कांबळेलावगण, तोणदे, भंडारपुळे व पिरंदवणे या गावांचा समावेश आहे.
या कामासाठी नायब तहसीलदार कांबळे यांच्यासह गावस्तरावरील महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन केले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार, जिथे पायवाट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत किंवा ग्रामस्थांच्या घरापर्यंत जाते तिथेच रस्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक सुविधा सुलभ होणार असून, शेतकऱ्यांना आपली उत्पादने बाजारपेठेत नेणे-आणणे अधिक सोपे होईल. सीमांकन करताना प्रशासनाने जमिनीचा योग्य वापर व वाद टाळणे याला प्राधान्य दिले. रस्ते बनवण्यासाठी लागणारी आजूबाजूची जमीन घेताना सर्व संबंधितांची संमती मिळवण्यात आली. त्यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवणार नाही, असा विश्वास महसूल विभागाने व्यक्त केला आहे.
सध्या प्रत्यक्ष सीमांकनाची प्रक्रिया सुरू असून, पुढील काही दिवसांत हे रस्ते महसूल विभागाच्या गावनकाशावर अधिकृतरीत्या दाखल केले जाणार आहेत. त्यानंतर निधी मंजुरीची कार्यवाहीही सोपी होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण आहे. अनेक गावांमध्ये पूर्वी पायवाटेवरूनच दळणवळण होत असले तरी आता त्या पायवाटा कायदेशीर व नकाशावरील रस्त्यात रूपांतरित होणार असल्याने भविष्यातील सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. तालुक्यातील उर्वरित गावातील रस्त्यांचे नियोजन पुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे.