हरचिरी जिल्हा परिषद गट कोणाचा बालेकिल्ला आहे, हे कार्यक्रमाला लाभलेल्या गर्दीने दाखवून दिले आहे. माझ्यानंतरची ही पिढी राजकारणात सक्रिय झाल्याचे मला समाधान आहे. ज्यांना आम्ही मदत करतो तेच आमच्या पाठीत खंजीर खुपसतात, असे सांगत पालकमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तालुक्यातील हरचिरी येथे कुरतडे- भाटकरकोंड पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री सामंत बोलत होते. या वेळी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे वाजतगाजत जंगी स्वागत करण्यात आले. ठाकरे सेनेचा बालेकिल्ला म्हणून या जिल्हा परिषद गटाची ओळख आहे.
या ठिकाणी पालकमंत्री सामंत यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे भूमिपूजन कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निमित्ताने सामंत यांनी शक्तिप्रदर्शन करत विरोधकांना धक्का दिला आहे. या प्रसंगी त्यांनी विकासकामांची यादी वाचून दाखवली. येथील ग्रामस्थांनी या गटात केलेल्या विकासकामाबद्दल सामंत यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला उद्योजक अण्णा सामंत, महिला उपजिल्हाप्रमुख विनाया गावडे, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, युवा तालुकाप्रमुख तुषार साळवी, विभागप्रमुख शंकर झोरे, प्रशांत शेरे, माजी पंचायत समिती सदस्य आप्पा कांबळे, विनायक गावडे, उमेश भाटकर, सुचिता पुटक, बबलू कोतवडेकर, अजय गोजीम यांच्यासहित शेकडो कार्यक्रर्ते उपस्थित होते.
विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल – याप्रसंगी सामंत म्हणाले, हरचिरी जिल्हा परिषद गट माझे घर असल्याचे मी समजतो. येथील विरोधकांनी माझ्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना रात्री बोलवून दम दिला तर मी त्यांच्यामागे हात धुवून लागेन. त्या वेळेस तुमची पळताभुई थोडी होईल. हरचिरी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा जो कोणी उमेदवार उभा राहील त्या विरोधकाचे डिपॉझिट जप्त होईल. या जिल्हा परिषद गटात कोणाची ताकद अधिक आहे, हे सर्वांनाच लक्षात आले असेल. नवीन पिढी राजकारणात सक्रिय होत आहे, याबद्दल मी खूपच समाधानी आहे.