सोन्याचे दागिने आणि पैशांसाठी मानसिक छळ केल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथील विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत पतीसह सासरच्या दोन महिलांविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृतः विवाहितेच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. चिपळूण येथील खाडीत २३ सप्टेंबर २०२५ ला अपेक्षा अमोल चव्हाण या विवाहितेने आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृत विवाहितेची आई सुनीता सखाराम गणवे (वय ६५, रा. कांदिवली, मुंबई, मूळ रा. शिवधामापूर, संगमेश्वर) यांनी १६ ऑक्टोबरला संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एप्रिल २०२५ ते २३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अपेक्षाचा तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी छळ केल्याचे नमूद केले आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांत विवाहितेचा पती अमोल शंकर चव्हाण (वय ४८), सासू आणि दिवा येथे राहणारी नणंद यांचा समावेश आहे. ते तिघेही शिवधामापूर (ता. संगमेश्वर) येथे राहतात. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अपेक्षा चव्हाण हिने तिच्या आईकडून कार्यक्रमासाठी सोन्याचे दागिने आणले होते. त्यापैकी काही दागिने तिचे पती अमोल याने गहाण ठेवले होते. ते सोडवण्यासाठी तक्रारदार यांनी पैसेही दिले होते; मात्र तिन्ही संशयित आरोपींनी संगनमताने तक्रारदार सुनीता गणवे यांनी दिलेले दागिने आणि पैसे परत मागू नयेत. तसेच व्यवसायासाठी माहेरहून पैसे घेऊन यावेत यासाठी अपेक्षा चव्हाण हिच्याकडे वारंवार तगादा लावला होता. त्यासाठी तिचा मानसिक छळही सुरू केला होता. सततच्या त्रासाला कंटाळून अपेक्षा हिने २३ सप्टेंबर २०२५ ला चिपळूण खाडीत उडी मारून आत्महत्या केली.

 
                                    