वादळामध्ये भरकटलेल्या ४ मासेमारी नौका व त्यावरील ३० मच्छिमार बांधव समुद्रातील तुफानाशी आणि जीवघेण्या आक्रळविक्राळ लाटांशी संघर्ष करत किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले आहेत. करंजा मच्छीमार सोसायटीच्या (चंद्राई व गावदेवी मरीन), २ बोटी, गुहागर तालुक्यातील वेलदूर मच्छिमार सहकारी संस्थेची १ बोट (बाप्पा मोरया) आणि दापोली तालुक्यातील कोळथरे सोसायटीची साईचरण बोट अशा एकूण ४ बोटी मच्छीमारीसाठी खोल समुद्रामध्ये गेल्या होत्या. गेले ६ दिवस अरबी समुद्रात सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे बोटी भरकटल्या. त्यांचा अन्य बोटींशी संपर्क होत नव्हता. अनेकांच्या प्रयत्नानंतर शुक्रवारी या बोटींशी संपर्क झाला. चारही बोटी व बोटीवर काम करणारे एकूण ३० कामगार सुखरूप असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या दरम्यान नवानगर मच्छिमार सहकारी सोसायटी लि. या संस्थेच्यावतीने आमदार भास्कर जाधव यांना तात्काळ शासकीय सहकार्य मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले होते. आमदार भास्कर जाधव यांनी तात्काळ या निवेदनाची दखल घेऊन शासकीय यंत्रणेला तात्काळ शोध कार्याचे आदेश दिले व त्वरित शोध कार्य सुरू झाले.
आलेल्या अरबी समुद्रात चक्रीवादळामुळे करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या २ नौका बेपत्ता झाल्या होत्या त्यापैकी चंद्राई, गावदेवी मरीन तसेच, वेलदूर मच्छीमार सहकारी संस्था लि. यांची नौका बाप्पा मोरया व दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साई चरण अशा ४ या नौकांसह सुमारे ३० ते ३५ मच्छीमार बांधव बेपत्ता झाले होते. सदर घटनेची माहिती करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत इंडियन कोस्ट गार्ड तसेच मत्स्य व्यवसाय विभाग यांना दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी ई-मेलद्वारे कळविले होते. बेपत्ता झालेल्या नौकांवरील सर्व कामगारवर्ग हा गुहागर तालुक्यातील असून गुहागर तालुक्यातील स्थानिक मच्छीमार कार्यकर्ते यांनी दि. २६ ऑक्टोबर ते दि. ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध म ार्गांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. आमदार भास्कर जाधव यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित शासकीय यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. बेपत्ता झालेल्या चार नौका व ३० कामगार सुखरूप असल्याची माहिती प्राप्त होताच आनंद व्यक्त केला.

