समुद्रस्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या पुणे हडपसर येथील रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) आणि शुभम सुनील सोनवणे (वय २२) या दोन युवकांचा तारकर्लीच्या समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर या दोघांना वाचविण्यास गेलेल्या ओंकार अशोक भोसले (वय २४) याला वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले आहे. यासंबंधीचे अधिक वृत्त असे की, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील हडपसर येथे राहणारे कुश संतोष गदरे (वय-२१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), ओंकार अशोक भोसले (वय- २६), रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) शुभम सुनील सोनवणे (वय २२) हे पाच युवक तारकर्ली येथे पर्यटनासाठी काल शुक्रवारी सकाळी आले होते. त्यांनी तारकर्ली येथे एका होमस्टेमध्ये वास्तव्यास होते. आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुम ारास हे पाचही युवक समुद्र स्नानासाठी गेले होते. काही वेळ समुद्र स्नानाचा आनंद लुटल्या नंतर हे पाचही युवक किनाऱ्यावर परतले व त्याठिकाणी वाळूचे किल्ले बनविणे आणि तत्सम खेळ खेळले.
त्यानंतर शरीराला आणि कपड्यांना वाळू लागली म्हणून रोहित कोळी आणि शुभम सोनवणे हे दोघे पुन्हा समुद्रात उतरले. यावेळी त्यांना पाण्याच्या खोलीचा तसेच लाटांचा अंदाज न आल्याने ते दोघेही जण समुद्रात गटांगळ्या खाऊ लागले. ही गोष्ट रोहन डोंबाळे, ओंकार भोसले, कुश गदरे यांनी पाहिल्यानंतर यातील रोहन आणि ओंकार या दोघांनी मित्रांच्या मदतीसाठी समुद्रात धाव घेतली. तर कुश गदरे याने किनाऱ्यावर असलेल्या वॉटरस्पोर्ट्सच्या मंडळीना तसेच स्थानिकांना मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी स्थानिक वॉटस्स्पोर्ट्स मंडळींनी समुद्रात धाव घेत रोहन आणि ओंकार यांना किनाऱ्यावर आणले. याबाबतची माहिती कुश गदरे याने दिली आहे. या बचाव कार्यात स्थानिक ग्रामस्थ समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, रांजेश्वर वॉटर स्पोर्टचे कर्मचारी सहभागी झाले होते.
यानंतर वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिक व स्थानिक ग्रामस्थांनी समुद्रात -बोटीद्वारे राबविलेल्या शोध मोहीमेत समुद्रात बुडालेल्या रोहित कोळी व शुभम सोनावणे यांचे मृतदेह सापडून आले. तर वाचविलेल्या पैकी ओंकार भोसले हा याची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने त्याच्यावर प्रथम ग्रामीण रुग्णालय व नंतर अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारानंतर ओंकार भोसले याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर मालवण पोलिसांनी तारकर्ली येथील घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, पोलीस हेडकोंस्टेबल श्री. जानकर हे करत आहेत.